वीस समस्यांबाबत मराठा समाजाने उठवला आवाज...वीज ग्राहकांना दिलासा द्या, अन्यथा आंदोलन छेडण्याचा दिला
इशारा; कार्यकारी अभियंत्यांनी दिले सकारात्मक आश्वासन…
कणकवली / उमेश परब – कोरोना महामारीत वीज ग्राहक त्रस्त आहे, त्यातच थकित वीज बिलापोटी सध्या वसुलीचा तगादा लावण्यात येत आहे,ग्राहकांना दिलासा द्यावा,वीज बिलात वाढीस स्थिर आकार व अन्य कर ग्राहकांना त्रासदायक ठरत आहेत.काही ठिकाणी वीज बिल आकारणी सरासरी केली जाते, रिडिंग घेतले जात नसल्याची भूमिका सुशिल सावंत,भाई परब,एस.एल सपकाळ यांनी मांडली. त्यावर योग्य ती दंडात्मक कारवाई करण्याचे आश्वासन कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांनी दिले.अखिल भारतीय मराठा सेवा संघाच्या वतीने कणकवली विभाग कार्यकारी अभियंता यांना विविध विविध समस्यांबाबत निवेदन देण्यात आले. यावेळी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष एस.टी. सावंत, कोकण उपाध्यक्ष एस.एल.सपकाळ, उपाध्यक्ष लवु वारंग,सुशील सावंत, भाई परब, बच्चू प्रभुगावकर ,निळकंठ वारंग,यश सावंत,आप्पा सावंत आर.जी. सावंत आदी पदाधिकारी व मराठा समाज कार्यकर्ते उपस्थित होते.वायरमन अरेरावी करतात,त्यावर कारवाई केली पाहिजे.वीज बिलातील व्याज आकारणी थांबवा,अशी मागणी करण्यात आली.त्यावेळी व्याज आकरणी हा धोरणात्मक निर्णय आहे.मात्र,मीटर रिडिंग न जाताच घेतलं जातं,हे लक्षात येत असल्याची कबुली कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांनी दिली.स्थिर आकार वाढवला गेला आहे,त्याला जबाबदार कोण? अशी विचारणा केली,त्यावर एमएआरसीच्या परवानगी शिवाय काहीही करता येत नाही,असे श्री.मोहिते यांनी सांगत आपल्या मागण्यांवर त्वरीत मार्ग काढला जाईल असे आश्वासन दिले.दिलेल्या निवेदनात म्हटले की,वीज ग्राहकांना अवास्तव वीज बिले व स्थिर आकार आकारली जात आहेत. कोरोना महामारीत सर्वसामान्य नागरिक आर्थिक समस्यांनी त्रासलेला आहे. तरीदेखील आपल्या कंपनीकडे ग्राहकांचे अनामत असताना देखील मीटर भाडे आकारले जात आहे, ही बाब चुकीची आहे. तसेच थकीत वीज ग्राहकांना वीज बिल माफी देणार अशी घोषणा उर्जा मंत्री नितीन ऱाऊत यांनी केली होती. मात्र ती अद्यापही वीज बिल माफी मिळालेली नाही. त्याकाळात वीज बिलांत माफी मिळणार म्हणून ग्राहकांनी वीज बिले भरली नाहीत. त्या वीज बिल वसुलीचा तगादा आपले अधिकारी व कर्मचारी लावत आहेत. वीज बिलांवर व्याज आकारले जाते, ते आकारु नये त्यामुळे मानसिक त्रास वीज ग्राहकांना होत आहे तो थांबवण्यात यावा. तसेच थेट विद्युत पुरवठा खंडीत तुमच्या अधिका-यांकडून केला जात आहे. तसे न करता ग्राहकांना सवलत देऊन सहानुभुतीने वसुली करावी. गावागावांत कोणतीही परवानगी न घेता वीज पोल व विद्युत ट्रान्सफार्मर याचे महावितरण कंपनीकडून कोणतेही भाडे किंवा मोबदला दिले जात नाही. त्यामुळे आपल्या कंपनीकडून वीज ग्राहकांना होणारा त्रास थांबवा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आम्ही देत आहोत. तरी या निवेदनाचा विचार करुन तातडीने मार्ग काढावा,असे म्हटले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)