तरीही पुढील काळात भाजपाची पिछेहाटच पहायला मिळेल….!
शिवसेना नेते अतुल रावराणे यांची प्रसिद्धीपत्रकाद्वारे खरमरीत टीका…!
कणकवली | उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ): केंद्र सरकारने केलेले कृषी कायदे सरकारलाच मागे घ्यावे लागणे हा बळीराजाच्या आत्मसन्मानाचा जबरदस्त विजय असून केंद्र सरकारच्या जाचक अटींच्या विरोधात शेतकऱ्यांनी उभारलेले आंदोलन हाणून पाडण्यासाठी केंद्रसरकारने येन केन प्रकारेण् प्रयत्न करूनही शेतकरी माणसे मागे हटली नाहीत. त्यामुळे हा शेतकऱ्यांचा जाहीर व नैतिक विजय म्हणजे केंद्र शासनाच्या झुंडशाहीविरोधात लोकशाहीचा विजय आहे….! पुढील निवडणुकांमधील पराभव ओळखून जरी हा निर्णय घेतलेला असला तरीही पुढील काळात भाजपाची पिछेहाटच पहायला मिळेल अशी जहाल टीका शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
शेतकऱ्यांनी वर्षभर जीव तोडून व नेटाने आंदोलन केले होते. आंदोलन चिरडून काढण्यासाठी केंद्र शासनानेही सर्वतोपरी प्रयत्न केले होते. शेकडो शेतकऱ्यांचे बळी गेले. लखीमपूरमध्ये पाच-सात शेतकऱ्यांना चिरडण्यात आले. मात्र अनेकप्रकारे शेतकरी आंदोलनकर्त्यांचा छळ करूनही शेतकरी मात्र आंदोलनावर ठाम राहिले. त्यामुळे केंद्र सरकारला शेतकरीविरोधातील काळे कायदे मागे घेण्याची वेळ आलेली आहे. केंद्र सरकारचा हा नैतिक पराभव आहे. भाजपाने पुढील रणनिती ठरवून येत्या निवडणुकांमध्ये आपला पराभव होणार हे जाणून हा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांसमोर सरकारला झुकावे लागले आहे. पुढील काळात भाजपाची पिछेहाट अटळ आहे.केंद्र सरकारने हा निर्णय घेऊनही शेतकरी नेते राकेश टिकेत यांनी ,”जोपर्यंत पार्लमेंटमध्ये हे कायदे रद्द केल्याबाबतचा कायदा संमत होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही”,असे जाहीर केले आहे. याचाच अर्थ केंद्र सरकारच्या निर्णयात व घोषणेमध्ये फरक आहे असे शेतकर्यांना वाटते आहे. केंद्र सरकारच्या एकूण विश्वासार्हतेलाच तडा गेला आहे असेच दिसून येते असेही श्री. रावराणे यांनी माध्यमांना दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)