आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूलचा १६ सप्टेंबरला माजी विद्यार्थी स्नेह मेळावा.
आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूलचा १६ सप्टेंबरला माजी विद्यार्थी स्नेह मेळावा.
मेळाव्यात माजी विद्यार्थी संघ सदस्य नोंदणीची महत्वपूर्ण प्रक्रिया.
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या आरोस येथील 'आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूल' प्रशालेच्या माजी विद्यार्थी संघाच्या वतीने माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्याचे आयोजन बुधवार, दिनांक १६ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता प्रशालेच्या 'अर्जुन सावंत सभागृह' येथे करण्यात आले आहे.
शाळेच्या विकासात माजी विद्यार्थ्यांचाही सक्रिय सहभाग असावा आणि शाळेशी असलेले माजी विद्यार्थ्यांचे ऋणानुबंध अधिक दृढ व्हावेत, या उद्देशाने संस्थेच्या मदतीने, शिक्षकांच्या मार्गदर्शनातून व माजी विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने सन २०२५ मध्ये आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूल माजी विद्यार्थी संघाची स्थापना करण्यात आली होती. माजी विद्यार्थ्यांना एका व्यासपीठावर आणणे, शाळेमध्ये उत्तम शैक्षणिक सुविधा निर्माण करण्यासाठी योगदान देणे, ज्ञानवर्धक व नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणे, तसेच ज्या संस्थेमुळे ही शाळा उभी राहिली आणि ज्या शिक्षकांनी आपल्या ज्ञान व संस्कारातून हजारो विद्यार्थी घडविले, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे असा या माजी विद्यार्थी संघाचा प्रमुख उद्देश आहे. याच भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्यामध्ये माजी विद्यार्थी, आजी - माजी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, संस्थेचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत.
या मेळाव्यात 'आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूल माजी विद्यार्थी संघाची सदस्य नोंदणी' देखील करण्यात येणार असल्याची महत्वपूर्ण माहिती देण्यात आली आहे.
या स्नेह मेळाव्यास प्रशालेच्या सर्व माजी विद्यार्थी, आजी - माजी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक आणि हितचिंतकांनी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूल माजी विद्यार्थी संघ, आरोस यांच्या वतीने करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)