विरण विकास संस्थेची वार्षिक सभा उत्साहात.
विरण विकास संस्थेची वार्षिक सभा उत्साहात.
श्री गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर सभासदांना शुभेच्छापर भेट.
पोईप | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या विरण विकास संस्थेची वार्षिक सभा नुकतीच ग्रामपंचायत मसदे चुनवरे च्या सभागृहात संपन्न झाली. ही सभा माजी वित्त बांधकाम सभापती अनिल कांदळकर यांच्या विशेष उपस्थितीत व संस्था चेअरमन रामदास पांजरी यांच्या अध्यक्षतेखाली संचलित करण्यात आली. या वेळी व्हाइस चेअरमन पंकज परब, संचालक मोहन घाडीगांवकर, दत्ताराम आंबेरकर, विश्वनाथ परब, काशिराम परब, बबन परब, जयेश नार्वेकर, सहदेव झोरे, जागृती परब, सौ. परब तसेच माजी संचालक सुभाष धुरी, सुभाष परब, मसदेकर गुरुजी, संस्था सचिव श्रीमती सावंत, माजी सचिव मोहन गावडे, विजय घाडीगांवकर, कर्मचारी वर्ग आणि संस्था सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संचालक मोहन घाडीगांवकर यांनी प्रास्ताविक केले तसेच उपस्थित मान्यवर व सभासदांचे स्वागत केले. माजी सचिव मोहन गावडे यांनी सभेच्या विषय पत्रिके प्रमाणे अध्यक्षांच्या परवानगीने सभेचे कामकाज सुरू केले. या मध्ये मागिल सभेचे इतिवृत्त वाचन व संस्थेच्या वार्षिक आर्थिक अहवालाचे वाचन करण्यात आले. संस्थेची कर्जवसुली १००% झाली असून पुर्वीचा तोटा भरून काढून आता संस्था ऊर्जितावस्थेत असल्याचे यावेळी सांगितले गेले. तसेच संस्थेच्या रेशन दुकानाचेही कामकाज समाधान कारक असल्याने सभासदांनी समाधान व्यक्त केले.
ज्या सभासदांच्या मुलांनी माध्यमिक, उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत यश संपादन केले आहे त्यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. हा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार प्रमुख पाहुणे अनिल कांदळकर, चेअरमन रामदास भाई पांजरी, व्हाइस चेअरमन पंकज परब यांच्या हस्ते करण्यात आला.
सभासद शेतकऱ्यांना श्री गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर शुभेच्छा म्हणून प्रत्येकी २ कि. ग्रॅ. गुळ भेट स्वरूपात देण्यात आला.
सभेच्या अंतिम टप्प्यात, आयत्यावेळी येणाऱ्या विषयावर काही सभासदांनी शंका प्रश्न उपस्थित केले त्या मध्ये संस्थेने सभासद शेतकऱ्यांना खते, बियाणे कीटकनाशके, अवजारे इत्यादी उपलब्ध करून द्यावीत, नवीन सभासद करून त्यांना कर्जपुरवठा करणे, संस्थेला आर्थिक फायदा होण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून छोटे मोठे व्यवसाय सुरू करावेत, संस्थेची स्वतःची इमारत, खत गोडाऊन अशा आवश्यक मालमत्ता निर्माण करण्यासाठी संस्था व्यवस्थापक मंडळाने प्रयत्न करावेत असे अनेक मुद्दे उपस्थित केले गेले. त्यावर अनिल कांदळकर व चेअरमन रामदास पांजरी व माजी सचिव मोहन गावडे यांनी आवश्यक ते मार्गदर्शन करुन या पुढील काळात आपल्या शंका व सूचनांची पूर्तता करण्यात येईल अशी ग्वाही दिली. सभेची सांगता आभार प्रदर्शनाने करण्यात आली.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)