ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
पळसंब येथे 'रानभाजी महोत्सव' उत्साहात.

पळसंब येथे 'रानभाजी महोत्सव' उत्साहात.

पळसंब येथे 'रानभाजी महोत्सव' उत्साहात.

Article image

 

श्री. जयंतीदेवी सांस्कृतिक कला क्रिडा मंडळाचे आयोजन.


रानभाजी पाककला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद.


मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या पळसंब शाळा क्रमांक १ येथे श्री. जयंतीदेवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ, पळसंब यांच्या वतीने दशक्रोशी मर्यादित रानभाजी महोत्सव आणि त्या अनुषंगाने आयोजित पाककला स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. २७ जुलै २०२६ रोजी आयोजीत या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सिंधुदुर्ग जिल्हा कृषी विभागाच्या विशेष सहकार्याने संपन्न झालेल्या या कार्यक्रमात मालवण तालुका कृषी आत्मा समितीचे अध्यक्ष प्रताप चव्हाण, मुख्याध्यापक विनोद कदम, रानभाजी अभ्यासक राजेश श्रृंगारे, जयंतीदेवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ, पळसंब अध्यक्ष उल्हास सावंत  सचिव चंद्रकांत गोलतकर आणि मान्यवरांची उपस्थिती होती.

Article image


श्री. देवी सरस्वतीला वंदन करुन पुष्पमाला अर्पण करुन 

मालवण तालुका कृषी आत्मा समितीचे अध्यक्ष प्रताप चव्हाण व राजेश श्रृंगारे यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी व्यासपीठावर, जिल्हा परिषद सदस्य वर्षा सांबारी, मंडळाचे अध्यक्ष उल्हास सावंत, श्रावण सरपंच नम्रता मुद्राळे, पळसंब सरपंच चंद्रकांत गोलतकर, मंडळाचे आजीव सभासद दिगंबर साटम, माधवी पळसंबकर, सुयोग पंडित व डॉ. सुरेश भोगटे तसेच माजी उपसभापती अशोक बागवे, ग्रामसेवक अमित कांबळी, ग्रामपंचायत सदस्य सत्यवान तेजम, ऋतुजा सावंत, पोलीस पाटील पुनम गोलतकर, आडवली हायस्कूल मुख्याध्यापक तुषार सकपाळ, जनता विद्या मंदिर त्रिबंक हायस्कूल प्रशालेचे शिक्षक सुतार आदि मान्यवर उपस्थित होते.

Article image


कार्यक्रमाचे सूत्रसंचालक मुख्याध्यापक विनोद कदम यांनी मान्यवरांसह उपस्थित सर्वांचे स्वागत केले. यानंतर कोकणी रानभाजी अभ्यासक राजा श्रृंगारे यांनी या विशेष उपक्रमाची प्रस्तावना केली. त्यांनी रानभाजीचे महत्व, आरोग्यासाठी फायदे यांची माहिती दिली. पळसंब परिसरात अजुनही रानभाज्यांची उपलब्धता आहे परंतु त्यांचं जतन करण्यासाठी आवश्यक ती मानवी खबरदारी घेण्याचेही त्यांनी आवाहन केले. निसर्गाने माणसाला चोच दिली असून दाणाही तोच देणार या तत्वावर कोकणातील भोजन व जीवन संस्कृती आधारलेली असल्याने, कोकणातल्या मागच्या सगळ्या पिढ्या ह्या तंदुरुस्तीसाठी ओळखल्या जात होत्या परंतु सद्य स्थितीत विविध रासायनिक प्रक्रियेतून उपलब्ध होणारी हरित उत्पादने व फक्त 'चवीला' प्राधान्य देणारी 'जेवणशैली' यामुळे आरोग्याच्या विविध समस्या बळावत चालल्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आपले सण आणि त्यांना अनुसरून घटक हे रानभाजीचा जागर करत असल्याचेही त्यांनी विशेष नमूद केले. 

Article image


यावेळी आत्मा समिती अध्यक्ष प्रताप चव्हाण, जि. प. सदस्य सौ. वर्षा सांबारी, डॉ. स्वरा भोगटे यांनी मनोगत व्यक्त केले.


यावेळी संपन्न झालेल्या, दशक्रोशी मर्यादित पाककला स्पर्धेला तीस स्पर्धकांचा सहभाग होता. कोकणी रानभाजी अभ्यासक राजा शुंगारे व जिल्हा परिषद सदस्य सौ. वर्षा सांबारी यांनी परिक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली. 

Article image

या स्पर्धेत तन्वी जगदिश घाडीगावकर (आडवली ) यांना प्रथम क्रमांक प्राप्त झाला तर सिमा शरद घाडीगावकर (आडवली ) यांनी द्वितीय तर विक्रांती प्रविण साटम ( आडवली ) यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला. जयवंती जयवंत सावंत ( पळसंब ) यांना उत्तेजनार्थ बक्षिस देऊन गौरविण्यात आले. सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.


या स्पर्धेतील विजेत्या बक्षिसांचे अनुक्रमे राणेशाही हॉटेल, उद्योजक रियान मुजावर, आजीव सभासद डॉ श्री . सुरेश भोगटे हे पुरस्कर्ते होते. श्री. जयंतीदेवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळाच्या वतीने उत्तेजनार्थ बक्षिस पुरस्कृत करण्यात आले. 

Article image

जयंतीदेवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळाचे अध्यक्ष श्री. उल्हास सावंत यांनी ह्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांची व पळसंब गावातील सर्व रहिवासी ग्रामस्थांच्या मेहनतीची व योगदानाची प्रशंसा केली. यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष अमरेश पुजारे, अमित पुजारे, शेखर पुजारे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रविकांत सावंत, हितेश सावंत, संतोष परब, रामचंद्र पुजारे, वैभव परब, शिक्षिका नेहा गवाणकर, पल्लवी सोनगडे उपस्थित होते. आडवली हायस्कूल मुख्याध्यापक तुषार सकपाळ यांनी आभार प्रदर्शन केले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स