नगराध्यक्षांकडे निरामयतेची 'एक महत्त्वपूर्ण किल्ली..!'
नगराध्यक्षांकडे निरामयतेची 'एक महत्त्वपूर्ण किल्ली..!'
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर यांची सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती सदस्यपदी निवड.
संपादकीय : निरामय' म्हणजे 'निरोगी' किंवा 'स्वास्थ्यपूर्ण..! 'सर्वे सन्तु निरामया....,' अर्थात, 'सर्व जण रोगमुक्त आणि सुखी राहोत' अशी सदिच्छा प्रार्थना हा आपला विचार सांस्कृतिक वारसा आहे. धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीत निरामय असण्याला आणि निरामयता राखण्याला महत्त्व आहे. निरामय आयुष्य जगण्यासाठी शारीरिक दृष्ट्या सुदृढ असणे तसेच मानसिक आणि भावनिक स्वास्थ्य लाभणेही तितकेच गरजेचे आहे. विचार शुद्धी, निरोगी शरीर आणि मन शांत असते, तेव्हाच खऱ्या अर्थाने आपण 'निरामय' जीवन जगत असतो. निसर्गाच्या सानिध्यात राहणे, संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि सकारात्मक दृष्टिकोन या गोष्टी आपल्याला निरामयतेकडे घेऊन जातात. थोडक्यात सांगायचे तर, निरामयता ही मानवी जीवनातील खरी समृद्धी आणि आनंदाची गुरुकिल्ली आहे. मालवणच्या नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर यांच्याकडेही अशा गुरूकिल्लीच्या जुडग्यातली एक महत्त्वाची किल्ली सोपवण्यात आली आहे.
मालवण नगरपरिषद नगराध्यक्षा सौ. ममता मोहन वराडकर यांची सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीवर सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या शिफारशी नुसार ही निवड करण्यात आली असून याबाबतचे पत्र जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिले आहे.
शासनातर्फे जिल्हास्तरीय आरोग्यवर्धिनी समिती स्थापन करण्यात आली असून या समितीचे अध्यक्ष म्हणून पालकमंत्री नितेश राणे आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विविध भागातील आरोग्यविषयक समस्या, अडचणी येथे सोडविल्या जातात. मालवण शहरातील आरोग्यविषयक समस्या मांडण्याच्या दृष्टीने नगराध्यक्षा ममता वराडकर यांची निवड करण्यात आली आहे.
नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर ह्यांना, बालपणापासूनच मालवण शहराला एक कन्या, गृहिणी, नगरसेविका आणि विद्यमान प्रथम नागरीक अशा विविध दृष्टीकोनांतून आणि जवळून अभ्यासता आलेले आहे त्यामुळे ह्या जबाबदारीला त्या एका अर्थपूर्ण गांभीर्याने हाताळून शहराच्या निरामयता विकासासाठी एक महत्वपूर्ण 'लोकप्रतिनिधी तत्व' ठरतील अशा प्रतिक्रिया व्यक्त होत असून त्यांचे विविध जाणकारांकडून अभिनंदन होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)