उच्चश्रेणी मुख्याध्यापिका सौ. देवयानी त्रिंबक आजगांवकर यांचा सेवापूर्ती सन्मान सोहळा उत्साहात.
उच्चश्रेणी मुख्याध्यापिका सौ. देवयानी त्रिंबक आजगांवकर यांचा सेवापूर्ती सन्मान सोहळा उत्साहात.
जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा पेंढऱ्याचीवाडी, पेंडूर, आजी - माजी विद्यार्थी, शिक्षक, पालक व ग्रामस्थ यांच्यावतीने आयोजित भव्य कार्यक्रम.
वेंगुर्ला : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातल्या जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा पेंढऱ्याचीवाडी, पेंडूर या प्रशालेच्या उच्चश्रेणी मुख्याध्यापिका सौ. देवयानी त्रिंबक आजगांवकर यांचा सेवापूर्ती निमित्त भव्य सन्मान सोहळा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. बुधवारी, २४ जून २०२६ रोजी शाळा पेंढऱ्याचीवाडी पेंडूर येथे आजी - माजी विद्यार्थी, शिक्षक, पालक व ग्रामस्थ यांच्यावतीने या भव्य सोहळ्याचे नियोजन करण्यात आले होते. मुख्य सोहळ्याच्या आरंभापूर्वी सर्वांच्या वतीने सदिच्छा प्रार्थना सादर करण्यात आली. त्यानंतर दीपप्रज्वलन व श्री देवी सरस्वतीला वंदन करून प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पेंडूर गावचे सरपंच संतोष गावडे, सिंधुदुर्ग जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, वेंगुर्ला पंचायत समिती सभापती शंकर घारे, सत्कारमूर्ती सौ. देवयानी त्रिंबक आजगावकर, मातोंड केंद्राचे केंद्रप्रमुख उत्तम पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सत्यवान बरकुटे, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष सौ. विनंती कोळेकर आणि प्रशालेचे विद्यमान प्रभारी मुख्याध्यापक श्री. समीर तेंडोलकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
सर्व मान्यवरांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. सत्कारमूर्ती सौ. देवयानी त्रिंबक आजगांवकर यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानपत्र प्रदान करून गौरवण्यात आले. उपस्थित महिलांच्या वतीने त्यांची ओटी भरण्यात आली.
यावेळी सौ. देवयानी आजगावकर यांच्या सेवापूर्ती सन्मान सोहळ्याला सरपंच संतोष गावडे, सिंधुदुर्ग जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, वेंगुर्ला पंचायत समिती सभापती शंकर घारे, केंद्रप्रमुख उत्तम पाटील, नंदू राणे, वीणा गावडे, साईशा फटनाईक, गौरी फटनाईक, जयश्री चव्हाण, साहित्यिक तसेच कोकण मराठी साहित्य परीषद सावंतवाडी तालुका अध्यक्ष दीपक पटेकर, रत्नप्रभा गावडे, समीक्षा बरकुटे, राऊळ गुरुजी, भरत कवठणकर, कवी राजेंद्र गोसावी, विविध मान्यवर व उपस्थितीतांनी मनोगत व्यक्त केले. या सोहळ्यात सत्कारमूर्ती सौ. देवयानी त्रिंबक आजगावकर यांच्या शिक्षकी कारकीर्दीतील प्रथम शिष्य तथा 'पहिली विद्यार्थिनी' प्रणाली पाळेकर सावंत यांनी विशेष मनोगत व्यक्त केले. प्रशालेचे ज्येष्ठ शिक्षक श्री. गुंडू शेळके यांनी आभार प्रदर्शन केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी पदवीधर शिक्षक मुकुंद काळोजी यांनी केले.
उच्च श्रेणी मुख्याध्यापक सौ. देवयानी त्रिंबक आजगांवकर नी ३६ वर्षे शिक्षकी सेवा सविनय सकारात्मकतेने बजावली. त्यांच्या सेवा निवृत्ती सोहळ्याला, त्यांच्या पहिल्या नियुक्तीपासून ते बदल्यांच्या विविध ठिकाणचे पालक, ग्रामस्थ तसेच त्यांचे अनेक माजी विद्यार्थी विद्यार्थिनी विशेष उपस्थित होते. ह्या सोहळ्याला मान्यवर म्हणून उपस्थित, सिंधुदुर्ग जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, वेंगुर्ला पंचायत समिती सभापती शंकर घारे व पेंडूर सरपंच संतोष गावडे या लोकप्रातिनिधिक 'त्रिमूर्तीने', केंद्रप्रमुख उत्तम पाटील व विद्यमान प्रभारी मुख्याध्यापक समीर तेंडोलकर आणि सर्वांच्या उपस्थितीत सत्कारमूर्ती सौ. देवयानी त्रिंबक आजगावकर व त्यांचे पती निवृत्त मुख्याध्यापक त्रिंबक आजगावकर यांच्या शैक्षणिक योगदानासोबतच त्यांचे लोकांशी लोकहीतासाठी असलेले योगदान हे अलौकिक कार्य असल्याचा आशय व्यक्त केला. यापुढेही सौ. देवयानी त्रिंबक आजगावकर यांच्या ३६ वर्षांच्या अनन्यसाधारण अनुभवाचा गावातील प्रशालेच्या सर्वांगीण उन्नतीसाठी उचित उपयोग व्हावा असे सांगताना त्यांनी सौ. देवयानी त्रिंबक आजगावकर यांना आता माणूस म्हणून देखिल भरभरून आनंद घ्यायचा सल्ला मान्यवर लोकप्रातिनिधिक त्रिमूर्तींनी दिला. सौ. देवयानी त्रिंबक आजगावकर यांनी घडवलेले हजारो विद्यार्थी आणि त्याच्या दुपटीचे पालक तसेच त्याच्या कितीतरी पटीने शालेय शैक्षणिक प्रक्रियेत साथ देणारे त्यांचे सहशिक्षक व सहशिक्षिका, विविध ठिकाणाहून आलेले सन्माननीय ग्रामस्थ , हितचिंतक आणि उपस्थित सर्वांनी एका सदैव शैक्षणिक जाणीवेतील वर्धिष्णू सात्विकतेला 'डोळे भरून आणि डबडबलेल्या डोळ्यांनी' प्रशंसेसह साजरे केल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
यावेळी व्यासपीठावरील मान्यवरांसह पेंडूर ग्रामपंचायत अधिकारी सोमा राऊळ, सेवानिवृत्त ज्येष्ठ शिक्षक दत्ताराम फटनाईक, निवृत्त प्राथमिक शिक्षक असोसिएशन सावंतवाडी अध्यक्ष रामनाथ राऊळ, शाळा मातोंड बांबर क्र. ५ शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रवी सावंत, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती वेंगुर्ला पदाधिकारी संतोष परब, सीताराम नाईक, प्रसाद जाधव, सिताराम लांबर, प्रतिमा पेडणेकर, कवी राजेंद्र गोसावी, भरत कवठणकर, सुरेश राऊळ, शब्दसखा गृपचे अध्यक्ष गोविंद मोर्ये व सहकारी , कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी अध्यक्ष दीपक पटेकर, सामाजिक कार्यकर्ते दादा नाईक, सेवानिवृत्त शिक्षक नंदकुमार राणे, पेंडूर पोलीस पाटील श्याम नेमण, कोल्हापूर येथील विलास मोरबाळे व परिवार, आजगावकर - पांढरे परिवार, मातोंड केंद्रातील शिक्षकवृंद, साटेलकर - पाटकर परिवार, आजी - माजी विद्यार्थी, शिक्षक, पालक, शिक्षणप्रेमी, हितचिंतक व बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.
जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा पेंढऱ्याचीवाडी, पेंडूर, आजी - माजी विद्यार्थी, शिक्षक, पालक व ग्रामस्थ यांच्यावतीने आयोजित अशा भव्य सोहळ्यात तन - मन - धन वाहून झटलेल्या सर्व सन्माननीय पालक, ग्रामस्थ, अनेक माजी विद्यार्थी - विद्यार्थिनी यांनी ह्या निरोपाच्या कार्यक्रमाला आपुलकी वर्धनाचा उत्सव बनवत मुलं, पालक व शाळेसोबतची आपली 'वीण' अधिक जास्त घट्ट झाल्याची प्रतिक्रिया सत्कारमूर्ती सौ. देवयानी त्रिंबक आजगांवकर यांनी दिली आहे तसंच या सोहळ्यात योगदान दिलेल्या प्रत्येकाचे आभार मानले आहेत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)