सावंतवाडीतील ऐतिहासिक मिलाग्रीस कॅथेड्रलमध्ये 'सांजांव' उत्साहात.
सावंतवाडीतील ऐतिहासिक मिलाग्रीस कॅथेड्रलमध्ये 'सांजांव' उत्साहात.
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन मनीष दळवी, जिल्हा बँक संचालक व्हिक्टर डांटस व रवी मडगावकर यांचा सत्कार.
सावंतवाडी | ब्यूरो न्यूज : सावंतवाडी येथील ऐतिहासिक मिलाग्रीस कॅथेड्रल (मदर चर्च) मध्ये बुधवार, २४ जून रोजी पारंपरिक आणि धार्मिक उत्साहात 'सांत जुवाव' म्हणजे सांजांव फेस्त सोहळा संपन्न झाला. डोक्यावर रंगीबेरंगी फुलांचे मुकुट म्हणजेच कोपेल परिधान करून, हातामध्ये माडाचे पिढे घेत ख्रिस्ती बांधवांनी पारंपारिक कोकणी गीतांच्या आणि धुमटाच्या तालावर ठेका धरत हा उत्सव साजरा केला.
या पवित्र मिस्सा समारंभासाठी सिंधुदुर्ग धर्मप्रांताचे महाधर्मगुरू व बिशप मोस्ट रेव्ह. अग्नेलो पिन्यारो उपस्थित होते. त्यांच्या मुख्य कारकिर्दीत झालेल्या या सोहळ्यात फादर मिलेट, फादर गाब्रियल, फादर अमृत, फादर ऑल्विन गोन्सालवीस आदी धर्मगुरूंनी सहकार्य केले. यावेळी पेरिश कॅथेड्रल मेंबर्स, ग्रेगरी डान्टस यांच्यासह ख्रिस्ती बांधव उपस्थित होते.
या सोहळ्याचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन मनीष दळवी, बँक संचालक व्हिक्टर डांटस व रवी मडगावकर यांचा बिशप मोस्ट रेव्ह. अग्नेलो पिन्यारो यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना मनीष दळवी यांनी, बिशप यांचे विशेष आभार मानले. मिलाग्रीस चर्चच्या वतीने राबवल्या जाणाऱ्या सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांचे कौतुक करत, चर्चच्या सर्व सामाजिक कार्याला जिल्हा बँकेच्या वतीने व वैयक्तिक पातळीवर सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
या परंपरेला जपत चर्चसमोरील विस्तीर्ण मैदानावर आबालवृद्धांनी पावसाचा आनंद घेत, ढोल - ताशांच्या तालावर आणि धुमटाच्या गजरात 'सांजांव'ची पारंपरिक गाणी गात नृत्य केले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)