'मामाचा गांव' जपलेला माणुस...!
'मामाचा गांव' जपलेला माणुस...!
उद्योजक व समाजसेवक श्री संतोष लुडबे वाढदिवस संपादकीय विशेष.
संपादकीय विशेष : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या वायरी, लुडबेवाडा येथील एक समाजाभिमुख क्रियाशिल व्यक्तिमत्व म्हणजे श्री. संतोष लुडबे. बाल आणि युवा अवस्थेपासूनच 'माणसांना व्यापक स्तरावर' एकत्र करुन काहीतरी विधायक करायची त्यांची वृत्ती...! युवा अवस्थेत ह्या वृत्तीला शक्तीची झालर आणि मध्यम युवा अवस्थेत नीती, युक्ती आणि क्वचित प्रसंगी 'आपलाच पुढाकार नाही तर कोणाचाच हातभार नाही' अशी क्रमप्राप्तीची समर्थता...!
ह्या सगळ्यात, श्री. संतोष ह्यांच्यात 'प्रपंच करावा नेटका' अशी कौटुंबिक अत्यावश्यकतेची 'सजग मराठी संतवाणी' सुद्धा त्यांच्या मनात सदैव रुंजी घालत असल्याने, त्यांच्यातला मायाळू व कष्टाळू पती आणि सजग 'बापुस' तसंच दरवर्षी अफाट मेहनतीच्या घमघमाटासह मोहरलेला 'हापूस' हे नेहमीच बहरत राहीलेले असतात हे विशेष....!
महाविद्यालयीन चळवळा युवक ते सामाजिक तळमळीचा खंदा सामाजिक कार्यकर्ता ह्या दरम्यान, श्री. संतोष लुडबे हे 'राजकीय स्थानकं आणि मानकं' सुद्धा तशी धीर गांभिर्यासहीत सन्मानाने पहात आले आहेत. त्यातून एकंदर 'लोकांच्या हिताची समिकरणं काय व कशी आहेत' ह्या विचारात चालणं त्यांना रुचत असतं. संतोष लुडबे ह्यांची दैनंदिन जीवनशैली प्रापंचिक आणि सामाजीक जाणीवांनी भरगच्च आहे आणि त्यातच त्यांच्या व्यक्तीमत्वात आजोळच्या नात्यातलं मातृत्व जपणारा एक 'मामाचा गांव' सुद्धा नकळत वसत गेलेला .!
मामाच्या गांवी सगळी चिंता मामाच्या खांद्यावर टाकून भाचरंडं जशी निर्धास्त आणि तरिही शिस्तीबद्ध देखरेखीखाली रहात असतात तसंच काहीसं स्वातंत्र्यपूर्ण परंतु स्वैराचार नसलेलं पर्यावरण श्री. संतोष लुडबे गरजूंना देऊ पहातात. गरीब म्हणजेही गरजू आणि 'समस्येत असलेला असलेली किंवा असलेले' देखिल गरजूच अशा संवेदनेने भारलेल्या भावनेचा व्यवहार ते जाणतात.
आखलेलं सगळं सफल होत नाही म्हणून आखायचंच थांबवणं ज्यांना जमत नाही अशा कार्यरत रेघेच्या आधारावर चालणाऱ्या माणसांपैकी संतोष लुडबे एक 'मामा माणुस' आहेत..!
मामाचा गांव आयता किंवा तयार मिळत नाही. त्यासाठी लोकांच्या न दिसणार्या वेदना, न बोलता येणार्या आत्यंतिकता आणि सर्वात महत्वाचं म्हणजे 'सत्पात्री देताना आखडतं घ्यायचं नसतं आणि माणुसकीच्या देवाण घेवाणीसाठी कोणीच कुपात्र नसतं' ही असंख्य अनुभवातून आलेली जाणीव म्हणजे 'मामाचा गांव' असतो..!'
जिथे परमेश्वराकडे," स्वामी इतना दिजिए जिसमे कुटुम समाए, मै भी भूखा ना रहे और साधू न भूखा जाए" अशी प्रार्थना असते आणि सोबतच 'मन का विश्वास कमजोर हो ना' अशी उपक्रमप्रशीलतेची माणसं जोडत जाणारी विनवणी असते.
संतोष लुडबे हे त्यांच्या वडिलांच्या स्वातंत्र सैनिक असल्याचं अभिमानाचं भान जपताना, कालानुरूप स्वातंत्र्याच्या बदललेल्या गैरसमज व अज्ञानाच्या जाणीवांनी व्यथित जरूर होतात परंतु त्यांच्या कार्यप्रवृत्त आधाराची रेघ खुंटीत होत नाही.
काहीसे रांगडे...काहीसे चिकित्सक आणि तरिही 'अथक' असे उद्योजक आणि समाजसेवी संतोष लुडबे यांच्या व्यक्तिमत्वात नित्य नव्याने मोहरणारा हापुस आणि त्याचा घमघमाट सदैव रहावा यासाठी त्यांचे सहकारी, हीतचिंतक आणि त्यांना जाणणारे त्यांच्यावर सदिच्छांची फवारणी 'बारमाही' सुरूच ठेवतात.....!
श्री गणपती चरणी जेंव्हा 'चिंता क्लेश सहस्त्र दुःख अवघे....देशांतरा पाठवी.....हे रंभा गणनायका गजमुखा भक्ता बहू तोषवी' ह्या आर्जवपूर्वक प्रार्थनेतील 'तोषवी' जाणीवेच्या मर्यादा वाढवत वाढवत गरजवंतांना तोषवू पहाणारे असेच संतोष लुडबे असं त्यांचे अध्यात्मिक वर्णन देखिल उचित ठरेल..!
'मामाचा गाव' हा चिंता, क्लेश आणि दुःख ह्यांवर मात करुन फक्त हास्य, समाधान आणि निर्मळता फुलवू पहाणारा तरतरीत अश्या मळ्याचा असतो....घमघमणारा काजू आंब्याच्या बागेचा असतो.....तृषाशांती करुन तोषवणारा शहाळ्याच्या पाण्याचा असतो....आणि श्री. संतोष लुडबे यांच्या सारख्या तोषवू पहाण्याच्या साध्या, सरळ तरिही जबाबदार जाणीवांचा असतो...!
सुयोग पंडित ( मुख्य संपादक, आपली सिंधुनगरी न्यूज)
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
ऋषी देसाई यांची 'नाटक मंडळी' समूहावरील परिचय लेखन सदराची तडाखेबंद शतकपूर्ती..!
ऋषी देसाई यांची 'नाटक मंडळी' समूहावरील परिचय ल...
आपापल्या 'कालिंदीं'साठीच्या प्रदूषणरूपी कालियाच्या पाच फण्यांची ओळख ....!
मालवणात नृत्य विशारद प्रचिती सौदागर यांच्या 'नृत्यशंभो' भरतनाट्यम् कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
मालवणात नृत्य विशारद प्रचिती सौदागर यांच्या ...