कुडाळ शहरच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी स्वच्छ भारत अभियान नागरी 2.0 अंतर्गत निधी मंजूर.
कुडाळ शहरच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी स्वच्छ भारत अभियान नागरी 2.0 अंतर्गत निधी मंजूर.
आमदार निलेश राणे यांच्या विशेष प्रयत्नांची नगराध्यक्षा सौ. प्राजक्ता बांदेकर यांची माहिती.
आमदार निलेश राणे यांच्यासह प्रशासन व सर्व सहकारी न. पं. सदस्यांचे मानले आभार.
कुडाळ | ब्यूरो न्यूज : कुडाळ शहराच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी ₹ १.०९ कोटीचा निधी मंजूर झाला आहे. आमदार निलेश राणे यांच्याकडे नगरपंचायतीने सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले. आमदार निलेश राणे यांच्या विशेष प्रयत्नांतून नगरपंचायतीला आवश्यक भूखंड उपलब्ध झाला असून स्वच्छ भारत अभियान नागरी 2.0 अंतर्गत हा निधी मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती कुडाळच्या नगराध्यक्षा सौ. प्राजक्ता बांदेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
कुडाळ शहर हे रेल्वे स्थानक, व्यापारी बाजारपेठ, एमआयडीसी व विविध नागरी सुविधांमुळे जिल्ह्यातील महत्त्वाचे केंद्र बनले आहे. दररोज मोठ्या प्रमाणावर व्यापारी, उद्योजक, कामगार, पर्यटक व ग्रामीण भागातील नागरिकांची ये-जा असते. त्यामुळे शहरातील घनकचऱ्याचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. वाढत्या कचऱ्याचे शास्त्रोक्त व दीर्घकालीन व्यवस्थापन करणे ही नगरपंचायतीसमोरची प्रमुख गरज होती. या पार्श्वभूमीवर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प अत्यावश्यक असल्याचे अधोरेखित करून आमदार निलेश राणे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या विशेष प्रयत्नांतून नगरपंचायतीला आवश्यक भूखंड उपलब्ध झाला असून या प्रकल्पासाठी ₹ १.०९कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती मिळत आहे.
प्रस्तावित प्रकल्पामध्ये बायोगॅस प्रकल्प – ओल्या कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती, एमआरएफ शेड - सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण व पुनर्वापर, सॅनिटरी लँडफिल – उर्वरित कचऱ्याची सुरक्षित व पर्यावरणपूरक विल्हेवाट आदी घटकांचा समावेश असल्याचे सौ. बांदेकर यांनी सांगितले आहे. या प्रकल्पामुळे शहरातील कचऱ्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया होऊन प्रदूषणावर नियंत्रण मिळविता येणार आहे. ओला व सुका कचरा वेगळा करून त्यावर योग्य पद्धतीने प्रक्रिया केल्याने स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि सार्वजनिक आरोग्य यांना मोठी चालना मिळणार आहे. या महत्त्वपूर्ण प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा करून निधी व जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल सौ. बांदेकर यांनी आमदार निलेश राणे यांचे कुडाळ न. पं. तर्फे आभार मानले आहेत. कुडाळ शहराला प्रथमच घनकचरा व्यवस्थापनासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध होत आहे. याच्या अंमलबजावणीमुळे 'स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी कुडाळ' या संकल्पनेच्या दिशेने एक ऐतिहासिक व निर्णायक पाऊल उचलले गेले आहे असे नमूद करत, नगरध्यक्षा सौ. बांदेकर यांनी प्रशासन व सर्व सहकारी न. प सदस्यांचे देखील आभार मानले व सकारात्मक ऊर्जेने प्रकल्प पूर्ण करणार असल्याचे सांगितले.
सौजन्य | कुडाळ ब्यूरो
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)