१५ व्या राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेचे मालवण चिवला बीच येथे आयोजन.
१५ व्या राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेचे मालवण चिवला बीच येथे आयोजन.
मालवण | ब्यूरो न्यूज : महाराष्ट्र राज्य जलतरण संघटना यांच्या मान्यतेने मालवण चिवला बीच येथे १३ व १४ डिसेंबर रोजी १५ व्या राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेचे आयोजन सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे. आठ राज्यातील सुमारे १५०० स्पर्धक या दोन दिवशीय स्पर्धेत सहभागी होणार आहेत, अशी माहिती संघटना अध्यक्ष श्रीकृष्ण (दिपक) परब व महाराष्ट्र जलतरण संघटना सचिव राजेंद्र पालकर यांनी दिली आहे.
दोन्ही दिवशी सकाळी सहा वाजता स्पर्धांना सुरवात होणार आहे. तर दुपारी एक वाजल्यापासून चिवला बीच येथेच बक्षीस वितरण मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. दरम्यान स्पर्धेचे उद्घाटन शनिवार, १३ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता मामा वरेरकर नाट्यगृह येथे होणार आहे. रात्री वावळेश्वर दशावतार नाट्य मंडळ तेंडोली यांचा दशावतार नाट्य प्रयोग होणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्पर्धकांसाठी संघटनेने खास सवलत दरात प्रवेशिका उपलब्ध केल्या आहेत. २००९ पासून सागरी जलतरण स्पर्धेचे मालवण चिवला बीच येथे आयोजन होत आहे. राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धा ही संपूर्ण भारतातील विशेष अशी स्पर्धा असून या स्पर्धेत ६ वर्ष वयोगटापासून ते ७५ वर्षांवरील स्पर्धक भाग घेत असलेली एकमेव स्पर्धा आहे. यावर्षी वय वर्ष ४ पासून ९५ वर्ष वयापर्यंत स्पर्धक सहभागी होणार आहेत.
तीन पिढ्या मुलगा, वडील, आजोबा एकत्र होणारी ही भारतातील एकमेव स्पर्धा असून या स्पर्धेचे विशेष आकर्षण म्हणजे गेली तीन वर्ष पासून दिव्यांग जलतरणपटू साठी एका वेगळ्या गटाचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धा पूर्ण करणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला मेडल, सहभाग प्रमाणपत्र व टी-शर्ट कॅप देण्यात येणार आहे. तसेच ग्रुपमध्ये विजेत्याना रोख बक्षीस, अन्य भेट वस्तू देऊन गौरविण्यात येणार आहे. एकूण आठ लाख रक्कमेची पारितोषिक, भेटवस्तू असणार आहेत. आठ राज्य मधील स्पर्धक आणि महाराष्ट्रातील बहुतांश सर्व जिल्हे यातील सुमारे १५०० स्पर्धक यांनी ऑनलाईन नाव नोंदणी पुर्ण केली आहे.
स्पर्धेच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्र राज्य जलतरण संघटने तर्फे १० किलोमीटर स्पर्धा व १ किलोमीटर, २ किलोमीटर फिन्स स्विमिंग स्पर्धा आयोजन होणार आहे. ही स्पर्धा पूर्ण झाल्यानंतर ऑल इंडिया फिन्स स्विमिंग चॅम्पियनशिप होणार आहे. त्या दिवशीचा पारितोषिक वितरण चिवला बीच येथेच होईल.
स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी १४ डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग जलतरण संघटना राज्यस्तरीय स्पर्धा ५०० मिटर एक किलोमीटर, दोन किलोमीटर, तीन किलोमीटर, पाच किलोमीटर या सर्व ग्रुपची स्पर्धा होणार. त्याचेही पारितोषिक वितरण होईल.
आंतरराष्ट्रीय स्पर्धेप्रमाणे यावर्षीपासून या स्पर्धेत ऑटोमेटीक टायमिंग सिस्टीम टच पॅड वापरली जाणार आहे. स्पर्धकांकडे रिस्ट वॉच असेल. तो स्कॅन होईल. वेळ नंबर त्यावर कळेल. एकूणच अधिक नवे बदल करून एक दर्जेदार असे या स्पर्धेचे स्वरूप असणार आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)