'नाताळलोक' प्रकारातील मिनी सिरीज़.... 'मॅन वर्सेस बेबी...!'
'नाताळलोक' प्रकारातील मिनी सिरीज़.... 'मॅन वर्सेस बेबी...!'
सिनेपट | सुयोग पंडित : नाताळ तथा ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांच्या अवती भवती फिरणारे कथानक आणि ख्रिसमसचा महिना म्हटलं की १९९० सालचा, ख्रिस कोलंबस दिग्दर्शित 'होम अलोन' हा सिनेमा आठवतो. तो ख्रिसमस काॅमेडी किंवा एकप्रकारे 'नाताळलोक' प्रकारातला होम अलोन फ्रॅन्चायझीचा पहिला सिनेमा होता. तशीच काहीशी 'नाताळलोकात' नेणारी एक सिरीज नेटफ्लिक्सवर आली आहे.
रोवन ऍटकिन्सन म्हणजे सर्वांचे लाडके 'मिस्टर बीन' यांची प्रमुख भूमिका असलेली 'मॅन वर्सेस बेबी' ही ब्रिटिश काॅमेडी मिनीसिरीज आहे. ही मिनीसिरीज ११ डिसेंबर २०२५ ला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली आहे. ही मालिका 'मॅन वर्सेस बी' चा पुढचा भाग आहे.
या मालिकेत, रोवन ऍटकिन्सनने 'ट्रेवर बिंगले' हे पात्र साकारले आहे. लंडन जवळच्या ग्रामीण भागातील एका शाळेत, उत्तर मध्यमवयाचा ट्रेवर मदतनीस म्हणून काम करत असतो. सिरीजच्या सुरवातीलाच, पाश्चात्य कुटुंब व्यवस्थेने 'बाधीत' असलेला ट्रेवरमधला असहाय्य पिता थोडा अस्वस्थ करतो पण तिथेच राॅवन ॲटकीन्सन तथा मधला एक संयत 'मिस्टर बीन' प्रेक्षकांना प्रसन्न ठेवतो.
ट्रेवरसाठी नाताळची सुट्टी लागण्यापूर्वीचा दिवस हा तसा त्याच्या नोकरीचा शेवटचा दिवस असतो.
तसा 'ट्रेवर सर्वांनाच नकोसा असतो आणि तरिही ट्रेवरला सगळे हवेहवेसे असतात' अशा फ्रेम्समधनं कथानक पहिल्या काही दृश्यातच सहज पुढे सरकत जातं.
ट्रेवरच्या शाळेत नाताळच्या सुट्टी सुरू व्हायच्या दिवशीच्या सांस्कृतिक कार्यक्रमात एक 'छोटा येशू' ( इन्फंट जीजस) ची भूमिका साकारायला चक्क एक खरंखुरं बाळ मिळणार असतं. त्याप्रमाणे ते बाळ शाळेच्या पायरीवर पोहोचतं देखिल पण ज्या आईने ते बाळ आणायचं ठरवलेलं असतं तिचं ते बाळ नसतं....!
शाळेत एका नवजात बाळाचं येणं, या बाळाच्या आणि ख्रिसमसच्या कार्यक्रमांच्या दरम्यान घडणारे गोंधळ, ट्रेवरच्या नवीन नोकरीचा शोध, ट्रेवरची बायको आणि तिचा बार्बॅडोसमधला श्रीमंत बाॅयफ्रेंड आणि ट्रेवरची मुलगी.... यांचं काय अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधायला नेटफ्लिक्सवरच्या 'मॅन वर्सेस बेबी' द्वारे नाताळलोकात जावं लागेल.
रोवन ऍटकिन्सन तथा मिस्टर बीन यांच्या सोबत स्टीव्ह एज, सुजॅन फिल्डिंग, सुनील पटेल, अलना ब्लोअर असे ब्रिटीश रंगभूमीवरील काही दिग्गज कलाकार या सिरीजमध्ये आहेत.
सिनेपट लेखन
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)