मुख्यमंत्र्यांच्या 'ठोस' आश्वासनानंतर 'व्हॉईस ऑफ मीडिया' चे उपोषण तात्पुरते स्थगित.
मुख्यमंत्र्यांच्या 'ठोस' आश्वासनानंतर 'व्हॉईस ऑफ मीडिया' चे उपोषण तात्पुरते स्थगित.
सावंतवाडी | ब्यूरो न्यूज : नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पत्रकार व पत्रकारितेशी संबंधित ३३ महत्त्वाच्या मागण्यांसाठी 'व्हॉईस ऑफ मीडिया' आणि 'व्ही.ओ.एम. इंटरनॅशनल फोरम'ने सुरू केलेले उपोषण अखेर थांबवण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थी आणि ठोस आश्वासनानंतर हे आंदोलन तात्पुरते थांबवण्यात आले आहे.
अधिवेशन सुरू झाल्यापासून 'व्हॉईस ऑफ मीडिया इंटरनॅशनल फोरम'च्या वतीने नागपूरच्या यशवंत स्टेडियम येथे साखळी उपोषण सुरू होते. या मागण्या १५ व १६ नोव्हेंबर रोजी पंढरपूर येथे झालेल्या राज्यस्तरीय शिखर अधिवेशनात एकमताने मंजूर करण्यात आल्या होत्या.
या उपोषणस्थळी १० आमदार, ३ खासदार आणि ४ माजी मंत्र्यांनी भेट देऊन संघटनेच्या कार्याची प्रशंसा केली. मात्र, या आंदोलनाची दखल घेत माजी मंत्री तथा कॅबिनेट मंत्री मंगलप्रसाद लोढा हे थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दूत म्हणून उपोषणस्थळी दाखल झाले.
"मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला हे उपोषण सोडवण्यासाठी पाठवले आहे. आपल्या मागण्या मान्य केल्या जातील," असे आश्वासन त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या वतीने दिले अशी माहिती मिळत आहे.
श्री. लोढा यांनी 'व्हॉईस ऑफ मीडिया'ने चौथा स्तंभ मजबूत करण्यासाठी केलेले कार्य नोंद घेण्यासारखे असल्याचे नमूद करत संघटनेला शुभेच्छा दिल्या.
आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, विश्वस्त व महाराष्ट्र समन्वयक किशोर कारंजेकर, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अनिल मस्के, नागपूर जिल्हाध्यक्ष दिलीप घोरमारे आणि राज्य कोअर कमिटीचे प्रमुख कल्पेश महाले यांना ज्यूस देऊन उपोषणाची अधिकृत सांगता करण्यात आली.
उपोषणाची सांगता झाली असली तरी 'व्हॉईस ऑफ मीडिया'चे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी संघटनेची भविष्यातील स्पष्ट भूमिका मांडली.
“मुख्यमंत्र्यांनी सर्व मागण्या मान्य असल्याचे स्पष्ट केले आहे. यासंदर्भात लवकरच बैठक घेऊन सविस्तर भूमिका मांडली जाईल. मात्र, जोपर्यंत मागण्यांचा शासन निर्णय (जी. आर.) निघत नाही, तोपर्यंत हा लढा सुरूच राहील," काळे यांनी दिलेल्या या इशाऱ्यामुळे पत्रकारांच्या मागण्यांवर तातडीने अंमलबजावणी करण्याची सरकारवर मोठी जबाबदारी असणार आहे. पत्रकारितेसाठी उभा केलेला हा लढा महाराष्ट्रात निश्चितच सकारात्मक बदल घडवेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)