जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय स्वच्छता दिनानिमित्त समुद्र किनारा स्वच्छता मोहीम.
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय स्वच्छता दिनानिमित्त समुद्र किनारा स्वच्छता मोहीम.
आचरा | ब्यूरो न्यूज : २० सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय स्वच्छता दिनानिमित्त राष्ट्रीय किनारा अभियान संपन्न झाले. या समुद्र किनारा स्वच्छता मोहीम अंतर्गत मालवण तालुक्यातील आचरा ते देवबाग समुद्र किनारी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वच्छता अभियानाचा शुभारंभ आचरा समुद्र किनारी करण्यात आला. स्वच्छता मोहिमेत सहभागी होत जिल्हाधिकारी यांनी प्लास्टिक पिशव्या, प्लास्टिकच्या बाटल्या आदी कचरा उचल प्राधान्याने केली गेली.
प्लास्टिक वापर दैनंदिन जीवनात कमी झाला पाहिजे. प्रामुख्याने प्लास्टिक पिशव्या, बॉटल सर्वत्र दिसून येतात. विघटन होत नसल्याने पर्यावरणावर या प्लास्टिकचा ताण वाढत आहे. पर्यावरणाचा समतोल राहावा यासाठी प्रत्येकाने प्लास्टिक वापर टाळल्यास ती कृती मोलाची ठरेल. यासाठी प्रत्येकाने आपल्या दैनंदिन वापरातील प्लास्टिक वापर शुन्यावर आणण्यासाठी प्रयत्नशील राहूया, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी आचरा येथे बोलताना व्यक्त केले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रामुख्याने मालवणसह किनारी भागात मोठया प्रमाणात पर्यटक येतात. त्यांच्या माध्यमातूनही प्लास्टिक कचरा वाढणार नाही याबाबतही जनजागृती महत्वाची आहे. प्रशासन स्तरावरूनही आवश्यक उपाययोजना केल्या जात असून त्यात अधिक व्यापकता आणली जाईल. मात्र प्लास्टिक कचरा मुक्ती साठी सर्वांचे योगदान आवश्यक आणि महत्वपूर्ण आहे, असेही जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले.
यावेळी मालवण तहसीलदार वर्षा झालटे, गटविकास अधिकारी शाम चव्हाण, आचरा सरपंच जेरॉन फर्नांडिस, उपसरपंच संतोष मिराशी, गटशिक्षणाधिकारी संजय माने, शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश राणे, पंचायत समिती विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी, महसूल कर्मचारी, ग्रामपंचायत सदस्य, बचत गट प्रतिनिधी, सामाजिक संस्था, शालेय विद्यार्थी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)