रोटरी क्लब मालवणचा पदग्रहण सोहळा संपन्न.
रोटरी क्लब सदस्यांच्या मुलांचा तसेच सामाजिक कार्याबद्दल बाळू अंधारी यांचा सत्कार.
मालवण | ब्यूरो न्यूज : रोटरी क्लब ही समाजाभिमुख काम करणारी संस्था आहे. मालवण रोटरी क्लबचे कार्य नेहमीच उत्तम व नावीन्यपूर्ण असेच राहिले आहे. हे कार्य असेच सुरु ठेवून नवनवीन लोकांना रोटरी क्लब मध्ये समाविष्ट करावे, असे प्रतिपादन रोटरी क्लबचे डिस्ट्रिक्ट चेअरमन सुभाष साजणे यांनी मालवण रोटरी क्लबच्या पदग्रहण समारंभात बोलताना केले.
मालवण रोटरी क्लबच्या २०२५-२६ या वर्षासाठी गठीत करण्यात आलेल्या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा व रोटरी क्लबचे नवीन सदस्य ओळख उपक्रमाचा शुभारंभ डिस्ट्रिक्ट ३१७० चे चेअरमन सुभाष साजणे यांच्या हस्ते व क्लबचे असिस्टंट गव्हर्नर डॉ. प्रशांत कोलते, असिस्टंट गव्हर्नर डॉ. विद्याधर तायशेटे यांच्या प्रमुख उपस्थितीत मालवण कुंभारमाठ येथील हॉटेल जानकी येथे शनिवार, १२ जुलै रोजी संपन्न झाला. या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते झाडाला पाणी घालून झाली. तर भंडारी ए. सो. हायस्कुलच्या विद्यार्थिनींनी स्वागतगीत सादर केले.
यावेळी रोटरी क्लब मालवणचे नूतन अध्यक्ष पंकज पेडणेकर यांच्यासह सचिव रंजन तांबे व खजिनदार चंद्रशेखर पेंडूरकर यांना सुभाष साजणे यांच्या हस्ते पदभार सुपूर्द करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर रोटरीचे डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी राजेश घाटवळ व प्रणय तेली, मावळते अध्यक्ष रमाकांत वाक्कर आदी उपस्थित होते. यावेळी रोटरी क्लब सदस्यांच्या गुणवंत मुलांचा सत्कार करण्यात आला. तसेच सामाजिक कार्याबद्दल लायन्स क्लबचे महेश उर्फ बाळू अंधारी, वकिली पदवी प्राप्त केल्याबद्दल सहिष्णू पंडित व नीट परीक्षेत यश मिळविणाऱ्या यश कदम यांचा सत्कार करण्यात आला. तर गतवर्षीचे रोटरीयन ऑफ दि इयर म्हणून प्रदीप जोशी यांना सन्मानित करण्यात आले. तसेच मालवण रोटरी क्लबच्या नवीन लोगोचे अनावरण यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. नवीन सदस्य म्हणून मिथिलेश मिठबावकर यांचे क्लबमध्ये स्वागत करण्यात आले.
यावेळी मावळते अध्यक्ष रमाकांत वाक्कर यांनी गतवर्षीच्या कार्याचा आढावा घेतला. मावळते सचिव पंकज पेडणेकर यांनी अहवाल वाचन केले. यावेळी विद्याधर तायशेटे, राजेश घाटवळ, डॉ. प्रशांत कोलते, प्रणय तेली यांनी मनोगत व्यक्त करीत मार्गदर्शन केले. तर नूतन अध्यक्ष पंकज पेडणेकर यांनी वर्षभरात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची रूपरेषा मांडत सर्वांच्या सहकार्याने अध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडू, असे सांगितले. सूत्रसंचालन डॉ. लीना लिमये यांनी केले. आभार सचिव रंजन तांबे यांनी मानले. यावेळी मालवण रोटरी क्लबचे सदस्य, जिल्ह्यातील रोटरी क्लबचे सदस्य व नागरिक उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)