सिंधुदुर्गात सात ठिकाणी 'सुरंगी वन' विकास उपक्रम.
सावंतवाडी | ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुर्मिळ मानल्या जाणाऱ्या ‘सुरंगी’ या वृक्षाचे जतन करण्यासाठी आणि पुढील पिढीला त्याचा फायदा व्हावा या उद्देशाने सात ठिकाणी ‘सुरंगी वन’ विकसित करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे, अशी माहिती सावंतवाडी वनविभागाचे उप वनसंरक्षक नवकिशोर रेड्डी यांनी दिली. गुरुवार, ०५ जून रोजी निरवडे येथे आयोजित वृक्षारोपणाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
या उपक्रमां्गत २ हजार ६०० सुरंगीची झाडे लावण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, यात ग्रामपंचायत आणि शासकीय कार्यालयांचा सहभाग घेतला जाईल, असे ते म्हणाले. सिंधुदुर्ग जिल्हा दुर्मिळ प्राण्यांसाठी जसा प्रसिद्ध आहे, त्याचप्रमाणे येथे दुर्मिळ वनस्पतींचाही मोठा साठा आहे. या वनस्पतींचा अभ्यास आणि जतन करणे ही काळाची गरज असल्याचे रेड्डी यांनी अधोरेखित केले.
राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यात “सुरंगी वने” विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, वनराज्यमंत्री गणेश नाईक यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविला जात आहे. दुर्मिळ होत चाललेली सुरंगी वाचवणे आणि तिच्याबद्दलचे ज्ञान पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या प्रमाणात सुरंगी झाडांची लागवड करण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात निवडण्यात आलेल्या सात ठिकाणी लवकरच ही झाडे लावण्यास सुरुवात होईल. या उपक्रमाचा शुभारंभ ०५ जून रोजी सावंतवाडीत झाला.
सावंतवाडी तालुका पत्रकार संघ, सावंतवाडी वन विभाग व निरवडे ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने निरवडे येथील वनविभागाच्या नर्सरी मध्ये जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून सुरंगीचे वृक्ष लावण्यात आले. यावेळी सहाय्यक वनसंरक्षक वैभव बोराटे, आजगाव वनपाल पृथ्वीराज प्रताप, वनरक्षक प्रकाश रानगिरी, अतुल पाटील, वैशाली पवार, गोपाळ सावंत, चंद्रकांत पडते, रामदास जंगले, निरवडे सरपंच सुहानी गावडे, उपसरपंच अर्जुन पेडणेकर, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन रेडकर, खजिनदार रामचंद्र कुडाळकर, डिजिटल मीडियाचे जिल्हाध्यक्ष अमोल टेंबकर, ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, हरिश्चंद्र पवार, रुपेश हिराप, निखिल माळकर, नरेंद्र देशपांडे, ओम टेंबकर, भुवन नाईक, सुभाष परुळेकर, हरी वारंग, दादा गावडे, सुहास पाटील, बाळा सावंत, नागेश गावडे, यशवंत पांढरे, संजय तानावडे, सुधीर माळकर, रेश्मा पांढरे, साक्षी भाईडकर, सुभद्रा कुबल, सुनिता भाईडकर, सुजाता जाधव, पूर्वा बागकर आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरिश्चंद्र पवार यांनी केले, पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन रेडकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी निरवडे गावातील ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)