एमआयटीएम अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये पदवीदान सोहळा उत्साहात.
मालवण | ब्यूरो न्यूज : जयवंती बाबू फाउंडेशन संचलित एमआयटीएम, ह्या सुकळवाड येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात नववा पदवीदान सोहळा नुकताच संपन्न झाला. यावेळी ७० हून अधिक विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. यात मेकॅनिकल, सिव्हिल, कॉम्प्यूटर, इलेक्ट्रॉनिक ॲन्ड टेली कम्युनिकेशन या शाखांमधून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा समावेश होता. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्री पंचम खेमराज कॉलेजचे विश्वस्त व यूनिव्हर्सिटी ऑफ मुंबई सिनेट मेंबर युवराज लखमराजे खेम सावंत भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी शैक्षणिक तसेच व्यावसायिक कार्याबद्दल मार्गदर्शन केले.
संस्थेचे उपाध्यक्ष विनोद कदम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, चांगल्या प्रतीचे इंजिनियर या कॉलेजने घडवले, असे सांगून शैक्षणिक क्षेत्राची प्रगती होणे गरजेचे आहे. तरच आपला देश पुढे जाईल. देशाचे भविष्य म्हणजे तुम्ही आहात. त्यामुळे शैक्षणिक धोरणात प्रगती करणे आवश्यक आहे. सर्वसामान्य विद्यार्थ्यांचा विचार करून हा जिल्हा शैक्षणिक दृष्ट्या प्रगतीपथावर येणे म्हणजे खरे यश आहे, असे ते म्हणाले. तर संस्थेचे अध्यक्ष संतोष पाल विद्यार्थ्यांशी संवाद साधत म्हणाले की, आयुष्यात आता तुम्ही पदवीधर होऊन बाहेर पडणार तर तुमच्यामध्ये सहनशक्तीची पातळी उंच असली पाहिजे. आयुष्यात कोणतेही काम करताना त्या कामाचे महत्त्व लक्षात घ्या. त्याचे श्रेय मिळाले नाही तर अपयशी होऊ नका. नव्याने उभे रहा. यावेळी त्यांनी एमआयटीएम कॉलेजच्या सुरुवातीच्या काळाविषयी बोलताना हा पूर्ण परिसर यापूर्वी जंगलमय होता. त्यावेळी आम्ही हे कॉलेज उभारले. आज आपल्या कॉलेजच्या विद्यार्थ्याने ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीची पीएचडी घेतलेली आहे. तसे कार्य तुम्ही करा आणि स्वतः बरोबर कॉलेजचे नाव देखील यशस्वी करा, असे ते म्हणाले.
कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस. व्हि. ढणाल यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. इंजिनियरिंग हा योग्य पर्याय तुम्ही तुमच्या आयुष्यात निवडलेला आहे. त्याचा योग्य पद्धतीने फायदा करा. नक्कीच यामुळे तुमचे भविष्य उज्वल होईल असे म्हणाले.
या कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक सावंत, संस्थेचे अध्यक्ष संतोष पाल, उपाध्यक्ष विनोद कदम, खजिनदार सौ. वृषाली कदम, प्राचार्य डॉ. एस. व्ही. ढणाल, परीक्षा विभागाचे डीन विशाल कुशे, उपप्राचार्य सौ. पूनम कदम, सर्व विद्यार्थी, व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा. सौ. जानकी पावसकर व सूत्रसंचालन प्रा. सौ. हिनाली कोरगावकर यांनी केले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)