वायरी बांध मालवण येथे महारुद्र स्वाहाकार उत्साहात संपन्न.
मालवण | प्रतिनिधी : परमपूज्य गुरुवर्य श्री सद्गुरू सदानंद माऊली महाराज यांच्या आशीर्वादाने आणि संप्रदायाचे प्रमुख पूजनीय श्री विलास (बापूजी) झाड यांच्या मार्गदर्शनाखाली श्री सदगुरु सदानंद माऊली महाराज संप्रदायाच्या वतीने श्री क्षेत्र दत्तमंदिर, वायरी बांध, मालवण येथे महारुद्र स्वाहाकार भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.
या कार्यक्रमाला विविध ठिकाणच्या भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली. सकाळपासूनच मंदिरात विविध धार्मिक विधींना प्रारंभ झाला. यात अभिषेक, पूजन आणि महत्वाचा भाग असलेला महारुद्र स्वाहाकार, ब्रह्मवृंदाच्या साथीने मंत्रोच्चारांनी संपन्न झाला. यात सांप्रदायिक भजनाचे आयोजन देखील करण्यात आले होते.
पूजनीय श्री विलास (बापूजी) झाड यांनी मार्गदर्शनातून उपस्थितांना अध्यात्माचे महत्त्व पटवून सांगितले. त्यांनी सदानंद माऊली महाराजांच्या शिकवणुकीवर प्रकाश टाकला आणि भक्तीमार्गाचे महत्त्व विशद केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात संप्रदायाच्या भक्त – शिष्य वर्गाने मोलाचे योगदान दिले. दोन दिवस चाललेल्या या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)