भंडारी ए. सो. हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाचा सुवर्णमहोत्सवी माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात.
मालवण | ब्यूरो न्यूज : मालवणच्या मामा वरेरकर नाट्यगृहात मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाचा सुवर्णमहोत्सवी माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात संपन्न झाला. ४ मे रोजी सिंधुदुर्ग जिल्हा बॅंक संचालक मनिष दळवी यांच्या हस्ते मेळावा कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन करुन उद्घाटन करण्यात आले. श्री. दळवी यांनी मनोगत व्यक्त केले आणि संस्था तसेच आजी माजी विद्यार्थी यांना सदिच्छा दिल्या. मेळाव्याची संकल्पना व उद्देश याची त्यांनी विशेष प्रशंसा केली.
यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष भंडारी एज्युकेशन सोसायटी (मालवण) मुंबई चे अध्यक्ष विजय पाटकर, पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, मुख्य कार्यकारी अधिकारी वामन खोत, श्री.चंद्रकांत मयेकर, श्री. अभिमन्यू कवठणकर, माजी मुख्याध्यापक वाय. आर. राजूरकर, माजी मुख्याध्यापक जे. एन. पाटील, माजी विद्यार्थी रुझारिओ पिंटो, अनिल देसाई सौगंधराज बादेकर, सौ. प्रविणा शिंदे, अनिकेत फाटक, भूषण मेतर, हेमंत शिरगांवकर, अश्विनी वायंगणकर आदी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवर पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे मेळाव्याला संबोधीत करताना म्हणाले की, हा सुवर्ण महोत्सव म्हणजे सर्व आजी माजी विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी आणून विचार विनिमय करण्याचा आणि एकमेकांचे सुख दुःख समजून घेण्याचा कार्यक्रम आहे. भंडारी कनिष्ठ महाविद्यालयाने सुवर्ण महोत्सवानिमित्त माजी विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा व कार्यक्रमांच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून दिले. माजी विद्यार्थी व संस्थेचा हा स्नेह कायम राहावा असे ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना संस्थेचे अध्यक्ष विजय पाटकर म्हणाले, माजी विद्यार्थी ही प्रत्येक शाळेचे असेट असतात. आमच्याही भंडारी एज्युकेशन सोसायटी हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये शिकून गेलेले माजी विद्यार्थी ही आम्ही आमची असेट मानतो. या विद्यार्थ्यांना घडविण्यामध्ये शिक्षकांचा फार मोठा वाटा असल्याने माझी शाळा, माझं कॉलेज, माझी वास्तु या जाणीवेतून भंडारी हायस्कूल या आपल्या गुरुकुलाकडे माजी विद्यार्थी येत असतात त्यांची पावले वळत असतात आज या मेळाव्याच्या निमित्ताने माजी विद्यार्थी हे शाळेवरील प्रेमापोटी, संस्थेवरील प्रेमापोटी एकत्र आलेले आहेतआपल्या गुरुकुलावरील प्रेम, आस्था,माया, ममता आणि जवळीक जीवनाच्या अंतापर्यंत कायम ठेवा असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी सुवर्णमहोत्सव वर्षानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांना गौरविण्यात आले. यावेळी मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला तसेच सुवर्णमहोत्सवासाठी मेहनत घेणाऱ्या प्रा. पवन बांदेकर यांचा संस्थेतर्फे विजय पाटकर तसेच माजी विद्यार्थ्यांतर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी भंडारी हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या शलाका वार्षिक अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तर दै. रत्नागिरी टाइम्सने सुवर्णमहोत्सवी माजी विद्यार्थी मेळाव्यानिमित्त प्रसिद्ध केलेल्या पुरवणीचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी मान्यवरांची समयोचित भाषणे झाली. सूत्रसंचालन ऍड. पलाश चव्हाण व दिपलक्ष्मी वायंगणकर यांनी केले. सौगंधराज बादेकर यांनी आभार प्रदर्शन केले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)