कै. रूपाली पणदूरकर यांच्या स्मरणार्थ अभ्यासिकेचे उद्घाटन.
जेष्ठ कायदे तज्ञ डॉक्टर श्री. राम पणदूरकर व सौ. हेमकिरण पणदूरकर दांपत्याचे कन्येच्या स्मरणार्थ दातृत्व.
कोल्हापूर | ब्यूरो न्यूज : कोल्हापूरच्या छत्रपती शिवाजी विद्यापीठात रूपाली पणदूरकर यांच्या स्मरणार्थ अभ्यासिकेचे उद्घाटन १७ फेब्रुवारी रोजी झाले. या विद्यापीठाचे भूगोल विषयाचे निवृत्त प्राध्यापक आणि विभाग प्रमुख, तसेच कोल्हापुरातील जेष्ठ कायदे तज्ञ डॉक्टर राम पणदूरकर व त्यांच्या सहचारिणी सौ. हेमकिरण यांनी त्यांची दिवंगत कन्या कुमारी डॉ. ॲड. रूपालीच्या स्मरणार्थ, शिवाजी विद्यापीठास रुपये साठ लाख निधी दिला होता. या निधीतून विद्यापीठाच्या ‘कमवा शिका महिला वसतीगृह” परिसरात ३०० मुलींसाठी सुसज्ज अभ्यासिका बांधण्यात आली.
या इमारतीचे उद्घाटन व कोनशीला अनावरण दिनांक १७ फेब्रुवारी रोजी सौ. हेमकिरण यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी डॉ. राम पणदूरकर यांनी मुलीच्या आठवणींना उजाळा देताना सांगितले की तिचे बालपण या विद्यापीठातच गेले. ज्या शिवबाजार मध्ये ती लहानपणी चॉकलेट घ्यायची, त्याच्याजवळच आज ही अभ्यासिका उभी आहे. समोर बसलेल्या मुलींच्या डोळ्यात माझी मुलगी दिसते आहे असे त्यांनी भावस्पर्शी उद्गार काढले.
या अभ्यासिकेच्या उद्घाटन प्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर डी. टी. शिर्के, कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. व्ही एन शिंदे, परीक्षा विभाग प्रमुख डॉ. अजित सिंह जाधव, डॉ. सुहासनी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
पणदूरकर कुटुंबीय मूळचे कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असून, डॉ. राम पणदूरकर यांचे पदवी शिक्षण सावंतवाडी येथे झाले आहे. आपल्या ३३ वर्षाच्या प्राध्यापक सेवेतून जमा झालेली पुंजी त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी समर्पित केली.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)