मालवण नगरपरीषद येथे जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रम उत्साहात.
लढलं पाहिजे, पुन्हा उभं राहिलं पाहिजे ; प्रमुख पाहुणे कवी नितीन चंदनशिवे यांचे मार्गदर्शन.
अध्यक्षस्थानी मुख्याधिकारी व प्रशासक श्री. संतोष जिरगे आणि मान्यवरांची उपस्थिती.
मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण नगरपरीषद सभागृह येथे मालवण नगरपरिषदेच्या वतीने ८ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय तथा जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. सांगली येथील ‘दंगलकार’ कवी नितीन चंदनशिवे यांची या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती होती तर अध्यक्षस्थानी मालवण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व प्रशासक संतोष जिरगे उपस्थित होते. श्रीम. जयश्री दुधभाते ( कृषी विभाग अधिकारी), श्रीम. संध्या लोखंडे व श्रीम. सुरेखा खैरनार ( अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग) यांची या कार्यक्रमाला मान्यवर म्हणून उपस्थिती होती.
पहिल्या महिला शिक्षिका आणि समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन वंदन करण्यात आले आणि कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यानंतर उपस्थित सर्वांचे स्वागत करण्यात आले. मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी प्रमुख पाहुणे नितीन चंदनशिवे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तसेच नगरपरीषदेच्या वतीने मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत सन्मान करण्यात आला. नगरपरीषद वरीष्ठ लिपीक श्री. महेश परब यांच्या हस्ते मुख्याधिकारी श्री. संतोष जिरगे यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना दंगलकार कवी नितीन चंदनशिवे यांनी स्वानुभव व आयुष्यातले काव्य व स्वानुभवातून स्वतःच्या महिला शक्तीची थोरवी सांगितली. एकविसाव्या शतकातील महाराष्ट्रात कुठलीच महिला वंचित राहू नये आणि त्यासाठी लढलं पाहिजे, पुन्हा उभं राहिलं पाहिजे असा मंत्र त्यांनी दिला. कविता हे आपलं अस्तित्व आहे आणि आपल्या विवाहानंतर ते अस्तित्व डोळसपणे खुलवण्यात आपल्या पत्नीचे योगदान असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘ज्ञान हा मानवाचा पहिला डोळा असावा व तो सदैव उघडा असावा’ हे सहज व ठामपणे दर्शवत त्यांना त्यांची पत्नी खंबीर साथ देत आहे असे ते म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाबाईंना वंदन करताना त्यांची कणखरता आत्मसात करण्याची आत्यंतिक आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. कवी नितीन चंदनशिवे यांनी त्यांच्या स्वरचित कवितांच्या सादरीकरणातून महिलांना, दैनंदिन जीवन, सावित्रीबाई फुलेंचे जीवन तसेच स्त्री शिक्षणाची उपयोगीता व गरज समजावून महिला दिनाच्या उद्देशांची महती समजावली व शुभेच्छा दिल्या.
यावेळी मनोगत व्यक्त करताना कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याधिकारी श्री. संतोष जिरगे यांनी सांगितले की हा जागतिक महिला दिन समस्त मानवजातीची चळवळ असावी. महिलांचे सक्षमीकरण ही महत्वाची बाब असून सर्वांनीच त्यासाठी जबाबदारीपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत असे त्यांनी सांगितले व महिलांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी मान्यवर श्रीम. जयश्री दुधभाते ( कृषी विभाग अधिकारी), श्रीम. संध्या लोखंडे व श्रीम. सुरेखा खैरनार( अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग) यांनी मनोगताद्वारे उपस्थित महिलांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमात मालवण नगरपरिषदेच्या वतीने मान्यवरांना ‘मालवण व्हिजन’ या स्मरणिकेची प्रत भेट देण्यात आली.
या कार्यक्रमाला मालवणातील महिला बचत गटांच्या सदस्या, मालवण नगरपरीषद अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशासकीय अधिकारी संध्या गवळी यांनी केले तर श्री. खेमराज सावंत यांनी आभार प्रदर्शन केले.
नगरपरीषदेच्या वतीने उपस्थित महिलांना भेटवस्तू व गुलाबपुष्प देऊन सदिच्छा सन्मान करण्यात आला.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)