आमदार निलेश राणे यांची महाराष्ट्र सागरी मंडळ अधिकाऱ्यांसोबत मुंबईत बैठक.
ब्यूरो न्यूज : कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार निलेश राणे यांनी मतदार संघाचा विकासात्मक कायापालट करण्याच्या पार्श्वभूमीवर मागील महिनाभर दोन्ही तालुक्यातील रखडलेली कामे मार्गी लावल्यानंतर किनारपट्टी विकासासाठी त्यांनी प्रयत्न हाती घेतले आहेत. ११ जानेवारी रोजी महाराष्ट्र सागरी मंडळ (मेरिटाइम बोर्ड) च्या अधिकाऱ्यांसोबत मुंबई येथे त्यांनी बैठक घेतली. या बैठकीत किनारपट्टी वरील अनेक महत्वाकांक्षी योजनांची संकल्पना मांडण्यात आली. यात देवबाग, तळाशील किनारपट्टीची धूप रोखण्यासाठी तामिळनाडूच्या धर्तीवर अद्यावत ग्रॉयस बंधारे उभारणे, देवबाग मधील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी खाडी किनारपट्टी वरून बंधारा कम रस्ता तयार करून येथील वाहतूक एकेरी मार्गांवरून वळवणे, मालवणच्या पर्यटन वाढीसाठी मालवण जेटी ते दांडी किनारपट्टीवर बंधारा कम रस्त्याचे काम पूर्ण करून मरिन ड्राइव्हच्या धर्तीवर सुशोभीकरण करण्याचे ठरवण्यात आले.
मालवण तालुक्यातील किनारपट्टीची होणारी धूप आणि स्थानिकांचे संरक्षण ही गेल्या अनेक वर्षांपासून चिंतेची बाब बनली आहे. त्यावर कायमस्वरूपी मार्ग काढण्याबरोबरच पर्यटन वाढीसाठी त्याचा उपयोग करून घेण्याचा निर्णय आमदार निलेश राणे यांनी घेतला आहे. त्या अनुषंगाने त्यांनी आज महाराष्ट्र सागरी मंडळ (मेरिटाइम बोर्ड) च्या अधिकाऱ्यांसोबत मुंबई येथे बैठक घेतली. या बैठकीला महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे मुख्य अभियंता राजाराम गोसावी, अधीक्षक अभियंता श्रीकांत बंगेर, कार्यकारी अभियंता मनीष मेतकर आदी अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत देवबाग संगम येथे अत्याधुनिक पद्धतीचा ‘ग्रोयस’ बंधारा उभारणी करणे, पर्यटन वाढीसाठी मालवण जेट्टी ते दांडी पर्यंत मरीन ड्राईव्हच्या धर्तीवर पर्यटकांच्या सुविधेसाठी प्रॉमिनाड्स बांधकाम करणे आणि इथून पुढे भविष्याच्या गर्दीचा अंदाज घेऊन फक्त बंधारा नाही तर रस्ता कम बंधारा असं काम हाती घेतलं पाहिजे असं ठरवण्यात आलं. या कामांसंदर्भात तसेच इतर अनेक प्रलंबित व प्रस्तावित विकासकामांबाबत सकारात्मक चर्चा झाली.आमदार निलेश राणे यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. देवबाग संगमच्या किनाऱ्यावर ग्रॉयल बंधारा उभारून समुद्राची धूप कमी करण्यात येणार आहे. तेथून टेट्रॉपॉट बंधारा बांधण्यात येणार आहे. देवबाग मध्ये बॅकवॉटरच्या दिशेने रस्ता कम बंधारा बांधून एकदिशा मार्ग तयार केला जाणार आहे. याठिकाणी पार्किंगची सुविधा उपलब्ध करून या रस्त्याचे सुशोभीकरण केले जाणार आहे. देवबाग मध्ये वाहतूक कोंडी होत असल्याने दोन्ही बाजूने एकदिशा मार्ग करून ही समस्या सोडवली जाणार आहे, अशी माहिती आमदार निलेश राणे यांनी दिली.
दांडी किनारपट्टीवर पर्यटकांच्या सुविधेसाठी प्रॉमिनाड्स टाकण्यात येणार आहेत. याठिकाणी सुशोभीकरण करून स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. येथे रस्ता कम बंधारा होणार आहे, असे ते म्हणाले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)