रावराणे परिवाराची राजस्थान सहल.
खोरकर (अरुळेकर )रावराणे मंडळ, मुंबई यांचे आयोजन.
मूळ भूमीचा दैदीप्यमान व लखलखता इतिहास पहाण्याची सुवर्ण संधी.
मुंबई | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील बारा गावातील रावराणे समाजातील परिवाराची मूळ भूमी राजस्थान (मेवाड) या ठिकाणी मुंबईतून शुक्रवारी ३ जानेवारी रोजी सहल निघणार आहे. एकूण सहा दिवस सहलीचा कार्यक्रम असून दरम्यान देवदेवतांचे दर्शन, महापुरुषांनी घडवविलेला दैदीप्यमान व लखलखता इतिहास व प्रेरणा स्थळ पहाण्याची सुवर्ण संधी लाभणार आहे. सुमारे एक हजार वर्षांपूर्वी रावराणे समाजाचे महापुरुष दक्षिणेकडे निघाले आणि नंतर ठिकठिकाणी विस्तार होत त्यांची एक शाखा वैभववाडी तालुक्यात स्थिरावली. काही वर्षांपूर्वी वैभववाडीत नव्याने बांधण्यात आलेल्या राणा महाराणा प्रताप कलादालनच्या उद्धघाटनाच्या वेळी मेवाडचे युवराज लक्ष्यराज सिंह हे आवर्जून उपस्थित राहिले होते त्यावेळी त्यांनी या समाजाला मेवाड भेटीचे निमंत्रण दिलेले आहे.
आपली मूळ जन्मभूमी कशी आहे, तेथील कुलदेवता, कुलदेव, महापुरुषांनी घडविलेला इतिहास आणि प्रेरणा स्थान याची पहाणी आणि अभ्यास करण्याची सुवर्ण संधी या निमित्ताने प्राप्त होणार आहे. ३ जानेवारी ते ८ जानेवारी पर्यंत सहलीचा कार्यक्रम असणार आहे. समाजातील सुमारे १०० जण या सहलीत सहभागी होणार आहेत.
सहली दरम्यान ऐतिहासिक चित्तोडगडावरील श्री. बाणमाता मंदिर, कालिका माता मंदिर, एकलिंगजी दर्शन, विजयस्तंभ, राणी पद्मिनीचे जौहार स्थळ, जलमहाल, संत मीराबाई मंदिर आणि उदयपूर येथील सिटी पॅलेस, दूध तलाई, फतेहसागर लेक, चेतक स्मारक, राणा महाराणा प्रताप स्मारक इत्यादी विविध स्थळांची पहाणी केली जाणार आहे. ही सहल खोरकर (अरुळेकर )रावराणे मंडळ, मुंबई यांनी आयोजित केली आहे. सहल प्रमुख संतोष सी. रावराणे आणि सहल प्रतिनिधी म्हणून राकेश र. रावराणे, सागर अ. रावराणे, विनायक स. रावराणे, सतिश शां. रावराणे हे व्यवस्था पहाणार आहेत अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष गणपत दाजी रावराणे व सचिव सुबोध पुंडलिक रावराणे यांनी दिली आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)