आचरा गावपळण १५ डिसेंबर रोजी.
आचरा | प्रतिनिधी : संस्थान आचरे गावची गावपळण सोमवारी दुपारी देवदिवाळी दिवशी रामेश्वराच्या कौलप्रसादाने ठरली. रविवारी १५ डिसेंबरला गावपळण होणार असल्याचे देवस्थान मानकरी यांनी सांगितले. दर चार ते पाच वर्षांनी गावपळणीचे वर्ष आल्यावर देवदिवाळीला बारापाच मानकरी दुपारी रामेश्वर मंदिरात जमून गावपळणीचा रामेश्वराला कौल प्रसाद घेतात. सोमवारी दुपारी देवदिवाळीला सर्व मानकरी, कमिटीदार यांनी मंदिरात जमून रामेश्वराला गावपळणीचा कौल प्रसाद घेतला गेला. यावेळी ग्रामस्थांनीही मंदिरात गर्दी केली होती. काही काळाच्या प्रतिक्षेनंतर गावपळण होण्याबाबत रामेश्वराचा कौल प्रसाद झाल्याने ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. पुर्वापार चालत आलेल्या परंपरेनुसार श्री दत्त जयंतीच्या दुसर्या दिवशी १५ डिसेंबरला रविवारी दुपारी गावपळणीला सुरुवात होणार आहे. गावपळणी दिवशी दुपारी तोफांच्या आणि नौबतीच्या इशार्यावर आचरावासिय गाव सोडण्यास सुरुवात करतात. वेशीबाहेर उभारलेल्या राहुट्यांमध्ये तीन दिवस तीन रात्री आनंदात घालवणार आहेत. चौथ्या दिवशी पुन्हा गावभरण्याचा कौल घेऊन गाव भरला जाणार आहे. सर्व धर्मियांचा रहिवास असलेल्या आचरे गावात गावपळणीची ही प्रथा खुप पुर्वीपासून सुरू आहे. गावपळणअनुभवण्यासाठी चाकरमानीही मोठ्या प्रमाणात सहभागी होत असतात. या अगोदर १२ डिसेंबर २०१९ रोजी गावपळण झाली होती.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)