'तो' हायमास्ट पुनर्प्रस्थापित केला गेला नाही तर खराब होणार ; माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी व्यक्त केली शक्यता.
नगरपरिषद प्रशासक हे विकास कामांच्या देखभालीत दिरंगाई करत असल्याची केली टीका..!
मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे नगरपरिषद प्रशासनाच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. टोपीवाला हायस्कूलच्या बोर्डिंग ग्राऊंडवर पडलेल्या अवस्थेत असलेल्या हायमास्ट टाॅवरबद्दल महेश कांदळगांवकर यांनी प्रसिद्धी पत्रात चिंता व्यक्त केली आहे. माननीय पंतप्रधानांच्या मालवण भेटी दरम्यान सुरक्षिततेच्या कारणास्तव तात्पुरत्या स्वरूपात काढलेला तो हायमास्ट आता सहा महिने झाले तरी लावला गेलेला नाही याकडे कांदळगांवकर यांनी लक्ष वेधले आहे.
मालवण शहरात टोपीवाला हायस्कूलच्या मालकीचे बोर्डिंग ग्राउंड आहे. याठिकाणी क्रिकेट ग्राउंड आहे. संध्याकाळी मैदानावर चालण्याच्या व्यायामासाठी जेष्ठ नागरिक, मुले, युवा वर्ग येत असतात. या ठिकाणी पुरेसा प्रकाश असावा या उद्देशाने टोपीवाला हायस्कूलच्या मागणी प्रमाणे ‘आमच्या नगरपरिषद लोकप्रतिनिधी कार्यकालात’ हा हायमास्ट बसविण्यात आला होता असे महेश कांदळगांवकर यांनी सांगितले. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ४ डिसेंबर २०२३ नेव्ही डे च्या निमित्ताने मालवण या ठिकाणी आले होते. त्यांचे आगमन मालवणच्या बोर्डिग ग्राउंड येथे हेलिकॉप्टर ने झाले होते. त्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हेलिकॉप्टर लँडिंगला अडथळा होणारा हा हायमास्ट मालवण नगरपरिषदेने तात्पुरत्या स्वरूपात काढून ठेवला होता. आता माननीय पंतप्रधान यांचा दौरा होवून जवळपास सहा महिन्याचा कालावधी होत आला आहे पण अजुनही तो हायमास्ट पुन्हा लावण्याबाबत कुठलीही कार्यवाही मालवण नगरपरिषदे कडून झालेली नाही. सुमारे सात लाख खर्च करुन लावलेला हा हायमास्ट प्रशासनाच्या दिरंगाई बोर्डिग ग्राउंड येथे धूळ खात जमिनीवर पडला आहे. पावसाळा नजीक येवून ठेपला आहे . त्याच्या अगोदर हा हायमास्ट पुनर्स्थापित झाला नाही तर तो खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी चिंता माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे व्यक्त केली आहे.
प्रशासकीय कालावधीत प्रशासकाच्या अशाच दिरंगाई मुळे खत मशीन, बायो टॉईलेट गाड्या, पिंपळ पार येथील रंगीत कारंजा , व्यापारी गाळे अशा स्थावर आणि जंगम मालमत्तेचे असे लाखो रुपयांचे नुकसान यापूर्वीच झाले आहे आणि त्यात आता या हायमास्टची भर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही असेही माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे सांगितले आहे. नगरपरिषद प्रशासक हे विकास कामांच्या देखभालीत दिरंगाई करत आलेले असल्याची टीका माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी केली आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)