माजी नगरसेवक दीपक पाटकर यांनी केली गतिरोधकांची मागणी ; देऊळवाडा येथील अपघात टाळण्याच्या उद्देशाने दिले निवेदन.
मालवण | प्रतिनिधी : मालवण शहरात देऊळवाडा येथे होणारे वाढते अपघात टाळण्यासाठी येथे गतिरोधक उभारण्यात यावेत, अशी मागणी माजी नगरसेवक दीपक पाटकर यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग मालवणचे उपविभागीय अभियंता यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. मालवण शहर हे पर्यटन शहर असल्याने शहरास भेटी देणा-या पर्यटकांचा ओघ सातत्याने वाढत आहे. देऊळवाडा हा मालवण शहरात प्रवेश करण्याचा मुख्य मार्ग असल्याने पर्यटकांची व नागरीकांची वर्दळ जास्त प्रमाणात होत असते. मालवण देऊळवाडा कसाल राज्य मार्ग क्रमांक १८२ रस्त्यास ते भरड मालवण या मुख्य रस्त्यास जोडला गेलेला आहे. हा रस्ता सार्वजनिक बांधकाम उपविभाग मालवण यांच्या अखत्यारीत येत असल्याने मालवण शहर देऊळवाडा नारायण मंदिर व जिल्हा परिषद देऊळवाडा प्राथमिक शाळा या ठिकाणी गतिरोधक बसविणे आवश्यक आहे असे या निवेदनात नमूद केले आहे.
२०२३ पूर्वी या ठिकाणी गतिरोधक अस्तित्वात होते. आजवर अति वेगात येणा-या डंपरमुळे सायकल, दुचाकी, तीनचाकी, चारचाकी वाहने, शाळकरी मुले यांचे या ठिकाणी ६ अपघात या ठिकाणी घडले आहेत. त्या अपघाताची नोंद मालवण पोलीस ठाणे अंतर्गत आहे. गतिरोधक झाले तर शहरात प्रवेश करणाऱ्या वाहनांच्या वेगावर मर्यादा येईल. अपघात होणार नाहीत. तरी या ठिकाणी पूर्वी गतिरोधक होते त्या ठिकाणी गतिरोधक बसवून दयावेत ही तमाम मालवण शहर वासियांची मागणी आहे असे माजी नगरसेवक दीपक पाटकर यांनी सांगितले आहे आणि त्यांच्या निवेदन पत्राचा गांभिर्याने विचार करुन गतिरोधक बसविण्या संदर्भात आपण काय कार्यवाही केली अथवा करणार त्या प्रक्रियेची माहिती द्यायला सांगितली आहे. तसे न झाल्यास जनतेने आंदोलन केले तर त्याची जबाबदारी संबंधीत विभागाची राहील असे माजी नगरसेवक दीपक पाटकर यांनी या पत्रात नमूद केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)