तंत्रज्ञानातील निष्काळजीपणा ही स्वीकारार्ह सबब नाही : जिल्हा पोलिस अधिक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांचे मालवणात विद्यार्थी वर्गाला मार्गदर्शन.
मालवण पोलिस ठाणे तर्फे सिंधुदुर्ग पोलिस दल आणि एम के सि एल यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर सिक्योरिटी व जनरल अवेअरनेस सत्र संपन्न ; जिल्हा पोलिस अधिक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांची व्यापक संकल्पना.
मालवण | सुयोग पंडित ( मुख्य संपादक) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या मामा वरेरकर नाट्यगृहात आज २० ऑक्टोबरला सकाळी १०:३० ते १२:३० या वेळेत मालवण पोलिस ठाणे तर्फे सिंधुदुर्ग पोलिस दल व एम के सि एल यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर सिक्योरिटी व जनरल अवेअरनेस सत्र संपन्न झाले. या सत्रामध्ये मालवण शहरातील अ शि दे टोपीवाला हायस्कूल, भंडारी एज्युकेशन सोसायटी काॅलेज व स का पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी सायबर सिक्योरिटी व जनरल अवेअरनेस संदर्भात प्रबोधन करण्यात आले.
यावेळी मंचावर जिल्हा पोलिस अधिक्षक सौरभ कुमार अग्रवाल, प्रवीण कोल्हे ( पोलिस निरीक्षक मालवण) , स का पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयचे प्रा. खोत, टोपीवाला हायस्कूलचे प्रा. गवळी, बांदेकर भंडारी एज्युकेशन सोसायटी काॅलेजचे प्रा. बांदेकर , एपीआय सुतार, ए पि आय घाग, एम के सि एल चे जिल्हा समन्वयक प्रणय तेली व एम के सि एलचे प्रतिनिधी श्री जुवेकर व इतर मान्यवर उपस्थित होते. मालवण पोलिस ठाण्याचे प्रभारी तथा पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी जिल्हा अधिक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले. त्यानंतर प्रणय तेली, स का पाटील एन सी सी प्रमुख प्रा खोत , प्रा गवळी, प्रा बांदेकर यांना पर्यावरण पूरक बुके तथा रोपं भेट म्हणून दिली.
सिंधुदुर्ग पोलिस हवालदार सुशांत पवार यांनी सर्वांचे स्वागत केले.
ए पि आय बडवे ( सायबर पोलिस ठाणे, सिंधुदुर्ग) यांनी त्यांच्या प्रास्ताविकात सायबर क्राईम म्हणजे काय ते स्पष्ट केले. बॅन्किंग संदर्भातील तांत्रिकता, विविध लिंकवर विश्वास न ठेवता ती फसवणुकीची केंद्र असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मानसिक स्तरावर सुद्धा फसवणूक होऊ शकते. आपले प्रोफाईल प्रायव्हसी सिक्योरिटी, अकाऊंट लाॅग इन बदलत राह्यले पाहिजे. आपण टेक्नोसेव्ही असल्याने आपण आपल्यासोबत आपल्या नातेवाईकांना, मित्र मैत्रिणींना या कार्यक्रमातून सायबर विषयी माहिती देत तुम्ही आता सायबर दूत बनू शकता असा संदेश त्यांनी दिला.
त्यानंतर एम के सि एलचे जिल्हा समन्वयक प्रणय तेली यांनी त्यांच्या तांत्रिक मार्गदर्शनाला सुरवात करताना सर्वांच्या वतीने सिंधुदुर्ग पोलिस दलाची, मालवण पोलिस निरीक्षक व अधिकारी तसेच कर्मचारी यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त केली.
त्यानंतर शिक्षक, पालक व जीवनातील सर्व घटकांचे आभार मानायचे आवाहन केले. आता बदलत्या शतकात रोज नवीन शिकावेच लागणार आहे आणि इंटरनेट शिवाय त्या शिकण्याला दुसरा पर्याय नसल्याचे त्यांनी सांगत तंत्रज्ञानाद्वारे मानवी आयुष्याची हानी होऊ नये याची काळजी म्हणजे सायबर सिक्योरिटी आहे. सायबर गुन्ह्यांचे प्रमाण आज दरवर्षी १८% ने वाढत आहे व सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या वर्षी ४०० पेक्षा जास्त फसवणुकीचे गुन्हे घडले. यात विविध गुन्हे करण्याकरिता अडकवलेही जाते. परदेशातून फसवले जाते, आपल्या वेळेचा उपयोग आपण अनोळखी व्यक्तीसोबत प्रेम, अभिनेता, माॅडेल व अभिनेत्री यांना श्रीमंत करणे, चॅट जिपीटी मुळे माहितीवर स्वयंचलित प्रोसेसींग होते, फसवणूक होते व रोजगारावरही परिणाम होत आहे. ‘नीट’ सारख्या परिक्षाही जी चॅट क्रॅक करु शकते. कृत्रिम बुद्धीमता तथा आर्टिफिशीअल इंटिलिजंस याचेही परिणाम घातक होऊ शकतो. फसवणूक होऊ नये म्हणून ‘ब्रिदींग पाॅज’ आवश्यक आहे. वाढलेला स्क्रीन टाईम वाढतोय व भारतात ४४ % लोक सोशल मिडिया वापरतात. सबस्क्रिप्शन फायनल करण्यापूर्वी विचार करावा.
या दरम्यान युवापिढीला अंमली पदार्थांचे जाळे पसरते व जाळ्यात ओढलेही जाते. फोटोंचे माॅर्फिंग, ब्लॅक मेलिंग केले जाते. सेल्फी काढताना होणारे अपघातसुद्धा वाढत आहेत. ‘इन्टंट’ पैसे व कर्ज यामधून प्रोसेसींग फी वसुल करुन फसवणूक केली जाते त्यामुळे आपण कोणत्या लिंकवर क्लिक करतोय त्याचे भान राखणे हीच काळाची गरज आहे.
१) फिशिंग २) सायबर स्टाॅकिंग ३) अश्लिल छायाचित्रे बघणे व शेअर करणे ४) डिफेमेशन मानहानी करणे ५) हॅकिंग ६) डेटा ब्रीच..तथा डेटाची चोरी ७) कार्डिंग ८) चिटींग व फ्राॅड या सर्वावर विजय मिळवण्यासाठी सायबर सिक्योरिटी आहे. पासरवर्ड हा टूथब्रशसारखा असावा. आपल्या डिजीटल फूटप्रिंटस सोडल्यानेही चोरी, फसवणूक होऊ शकतात. आपल्या मोबाईवरील काहीही डिलीट केले तरी ‘सायबर पोलिसांकडे’ सर्व रेकाॅर्ड असते. अनोळखी माणसांचे इमेल व ॲटॅचमेंट, लिंक उघडू नयेत. पासवर्डमध्ये अंक, अक्षर व चिन्हाचा वापर करावा. डेटाचा बॅक अप सतत ठेवावा. हरवलेला मोबाईल *#06# जतन करुन ठेवल्यास पोलिसांच्या सहाय्याने मोबाईल सापडू शकते. सायबर सिक्योरिटी ॲपची मदत घेऊन सावधगिरी बाळगता येते.
मालवण पोलिस ठाण्याचे निरीक्षक यांनी त्यांच्या मनोगतात या उपक्रमाबद्दल सांगताना प्रथम जिल्हा पोलिस अधिक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या संकल्पनेतून सायबर सिक्योरिटी व जनरल अवेअरनेस सत्रातील सर्वांचे स्वागत केले व आज जरी तुम्ही विद्यार्थी आहात पण उद्या तुम्ही देशाचे भविष्य आहात. अनावधानाने घडलेल्या कृतीने तुम्ही एखाद्या मोठ्या घटनेचे व प्रकरणाचे आरोपी बनू शकता. दंगलीसारख्या गुन्ह्यातही तुम्ही आरोपी बनू शकता. बनावट अकाऊंट वरुन अनेक असामाजीक प्रकार घडू शकतात. पाॅर्नोग्राफी बाबतही आपण आरोपी, पिडीत काहीही होऊ शकतो. आपण जे स्टेटस ठेवतो त्यावरुन भुरट्या चोरांना आपली लोकेशन कळते व त्यांचे फावते. मेट्रीमोनिअल साईटसवरुन फसवणूक होऊ शकते. हा कार्यक्रम कोरोनाच्या पहिला डोस असल्यासारखाच आहे जेणेकरुन तुम्ही सजग व सक्षम नागरीक होऊ शकता.
या दरम्यान उपस्थित विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी या संदर्भात माहिती पत्रिका देण्यात आली.
जिल्हा पोलिस अधिक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी या सायबर सुरक्षा सप्ताहा अंतर्गत राबवल्या जाणार्या या व्यापक मोहिमेची सर्वांना माहिती दिली. ‘स्क्रीन टाईम’ संकल्पना स्पष्ट करताना त्यांनी आपला सृजनशील वेळ कसा वाया जातो ते स्पष्ट केले. तंत्रज्ञानामुळे यांत्रिकीकरण व स्वयंचलितपणा आल्यामुळे आपल्याकडे कौशल्य वृद्धी झाली पाहिजे. कौशल्य विकासकामांचा अभ्यास महत्वाचा असून आता आपला सृजनशील वेळ सार्थकी लावणे ही गरज आहे. आभासी जगातील कौतुक व प्रशंसा वास्तवात येत नाही. सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस दल तर सायबर सिक्योरिटी मध्ये सक्षम आहेच परंतु प्रत्येकानी आपापली काळजी घेतली तर गुन्हे घडणे, आरोपी बनणे व पिडीत बनणे याचे प्रमाण कमी होईल. युवा शक्ती कुठल्याही व्यसनात अडकू नये कारण त्यांच्या कडे प्रचंड स्थितीज प्रतिभा आहे व ती टिकावी हा या मोहीमेचा मूळ उद्देश आहे. सायबर बुलींग घडले तर कारवाई होऊ शकते असेही त्यांनी स्पष्ट केले. २७ ऑक्टोबर पर्यंत चालणार्या या मोहीमेच्या प्रतिसादाबद्दल त्यांनी सर्वांची प्रशंसा केली. या सत्रात जवळपास ६०० विद्यार्थी विद्यार्थिनींचा सहभाग होता.
शेवटी कार्यक्रमाचे सूत्रसंचालक पोलिस हवालदार सुशांत पवार यांनी सर्वांना सायबर शपथ दिली व पोलिस अधिक्षक सौरभ कुमार अग्रवाल, पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे, एम के सि एलचे जिल्हा समन्वयक प्रणय तेली व इतर सर्वांचे आभार मानले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)