मच्छिमारांसाठी 'मासेमारी व पर्यटन' असे दुहेरी परवाना द्यायची नीलक्रांती कृषी व मत्स्य पर्यटन सहकारी संस्थेचे अध्यक्ष रवीकिरण तोरसकर यांची सहकार भारती आयोजित राष्ट्रीय मत्स्यसंमेलनात मागणी.
मालवण | सुयोग पंडित : नवी मुंबईतील वाशी येथे काल ०६ऑक्टोबर २०२३ रोजी विष्णुदास भावे सभागृहात सहकार भारती संघटनेने राष्ट्रीय मत्स्य संमेलन आयोजित केले होते. या संमेलनाला २५ राज्यातील ६०० प्रतिनिधी उपस्थित होते. यामध्ये गोडे पाणी, खारेपाणी तसेच निमखारे पाण्यातील मच्छिमार संघटना व मत्स्य शेतकरी सहभागी झाले होते. त्याचप्रमाणे मत्स्य व्यवसाय क्षेत्रातील सहकारी संस्थांचे प्रतिनिधी सुद्धा मोठ्या प्रमाणात आले होते. एकीकृत मत्स्य पालन विकास या विषयाच्या अनुषंगाने संमेलनात विविध चर्चासत्रे संवाद व तज्ञांचे मार्गदर्शन झाले.
राष्ट्रीय मत्स्यसंमेलनाचे उद्घाटन केंद्रीय मत्स्योद्योग मंत्री श्री पुरुषोत्तम रुपाला यांच्या हस्ते झाले यावेळी त्यांनी प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी यांनी मत्स्यव्यवसाय संदर्भात सुरू केलेल्या योजनांचा तसेच गेल्या ९ वर्षांत वाढलेल्या आयातीचा उल्लेख करत मत्स्यव्यवसाय मध्ये भारत अग्रेसर असल्याबाबत सांगितले. तसेच त्यांनी उपस्थित प्रतिनिधींना आपल्या समस्या व सूचना सहकार भारती मार्फत केंद्रीय मत्स्योद्योग मंत्रालयाला अवगत करण्यास सांगितले. यावेळी देशभरातून आलेल्या विविध प्रतिनिधींनी आपआपले म्हणणे, समस्या याबाबत सूचना केल्या. यामध्ये प्रथमच राष्ट्रीय स्तरावर एक मच्छीमार दोन परवाने ही संकल्पना नीलक्रांती कृषी व मत्स्य पर्यटन सहकारी संस्थेचे अध्यक्ष श्री रविकिरण तोरसकर यांनी मांडली .
केंद्रीय सागरी मत्स्योद्योग धोरण २०१६ च्या अंतर्गत मच्छीमारास मासेमारी तसेच पर्यटन असे दोन परवाने देण्याबाबत तरतूद केली आहे .सदर तरतुदीचा वापर करून त्याचे कायद्यात रूपांतर व्हावे जेणेकरून मच्छीमारास मासेमारी बरोबरच पर्यटनातून उत्पन्नाचा स्रोत निर्माण होईल अशी भूमिका मांडली. राष्ट्रीय पातळीवर अशा प्रकारची भूमिका पहिल्यांदाच मांडण्यात आली. यावर उपस्थित सहकार भारती राष्ट्रीय महामंत्री श्री उदय जोशी ,राष्ट्रीय संयोजक -सहकार भारती- मत्स्यप्रकोष्ट ,श्री जयंतीभाई केवट यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
एक मच्छीमार दोन परवाने या संकल्पनेला उपस्थित मच्छिमार प्रतिनिधींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी आमदार रमेश दादा पाटील ,आमदार श्री. गणेश नाईक,आमदार. श्रीमती मंदाताई म्हात्रे महाराष्ट्र फिशरमन फेडरेशन चे अध्यक्ष रामदास संधे,सहकार भारती मत्स्यप्रकोष्ट महाराष्ट्र संयोजक श्री वासुदेव सुरजुसे ,डॉक्टर विवेक वर्तक तसेच इतर मान्यवर उपस्थित होते .
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)