सरकत्या वाळूत भक्कम उभे रहाणार्या हरी खोबरेकर यांना आलिशान घरात बसून कोणी ज्ञान शिकवू नये ; ग्रामपंचायत सदस्य नवनाथ झोरे यांचा भाजपच्या बाळा गोसावींवर प्रतिहल्ला.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली धनगर समाजाच्या प्रगतीसाठी आम्ही सक्षम वचनबद्ध असल्याचाही दिला संदेश.
मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या देवली येथील ग्रामपंचायत सदस्य नवनाथ झोरे यांनी भाजपच्या बाळा गोसावी यांच्या तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्या वरील टीकेवरच प्रतीहल्ला चढवला आहे. काल भाजपच्या बाळा गोसावी यांनी हरी खोबरेकर यांच्या ‘पायाखालची वाळू सरकली आहे’ असे प्रसिद्धीपत्रातून जाहीर केले होते त्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत सदस्य व ऑल इंडिया धनगर समाज उपाध्यक्ष नवनाथ झोरे यांनी बाळा गोसावी यांना कानपपिचक्या दिल्या आहेत.
नवनाथ झोरे यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे सांगितले की हरी खोबरेकर यांचा जन्म वाळूमधलाच आहे व ते सरकत्या वाळूत भक्कम उभे रहायची क्षमता ठेवतात. बाळा गोसावी यांनी आलिशान घरात बसून त्यांना ज्ञान पाजायची गरज नाही. ‘उथळ पाण्याला खळखळाट फार’ अशा विमनस्क अवस्थेत सध्या बाळा गोसावी असल्याचा नवनाथ झोरे यांनी टोला लगावला.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक तसेच तालुका प्रमुख हरी खोबरेकर व इतर पदाधिकारी व शिवसैनिक हे धनगर समाजाच्या प्रगतीसाठी सक्षम वचनबद्ध असल्याचे नवनाथ झोरे यांनी स्पष्ट केले. आमदार वैभव नाईक यांच्या मार्गदर्शनामुळेच आपल्या सारखा सामान्य कार्यकर्ता ग्रामपंचायत सदस्य बनून प्रगतीसाठी प्रयत्न करत आहे या मधून आमदार वैभव नाईक यांचे तळागाळातील लोकांशी एकरूप व्हायचे नेतृत्व गुण स्पष्टपणे दिसतात असेही नवनाथ झोरे यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे सांगितले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)