दैव बलवत्तर म्हणून दोघे सुरक्षित ; सोबत असलेल्या मोटरसायकलचा १८ तासांनी शोध.
चौके | अमोल गोसावी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या चाफेखोल ते वडाचापाट दरम्यानच्या चाफेखोल-माळवाडी जवळील छोट्या पुलावरून पुराच्या पाण्याच्या तीव्र प्रवाहात दुचाकी वाहून जाण्याची दुर्घटना काल मंगळवारी १८ जुलैला संध्याकाळी साडेतीन ते चार वाजण्याच्या दरम्यान घडली. यात दुचाकीवरील दोन्ही युवक दैव बलवत्तर म्हणून सुदैवाने वाहून जाण्यापासून बचावले . त्यातील एकाला किरकोळ दुखापत झाली होती.
आज सकाळी ११ वाजता म्हणजे सुमारे १८ तासानंतर वाहून गेलेली सदर दुचाकी ओढ्यात पुलापासून सुमारे ५० मीटरवर शोधमोहीम राबविणाऱ्या स्थानिक तरुणांना आढळून आली.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि , नांदोस गावठणवाडी येथील श्री. विनोद माळकर आणि श्री. सतिश जाधव हे दोघेजण स्वतःच्या ताब्यातील मोटरसायकल घेऊन बागायत येथे डॉक्टरकडे आले होते. तेथून पुन्हा गोळवण येथे घरी परतत असताना सायंकाळी साडेतीन वाजता चाफेखोल वडाचापाट मार्गावरील चाफेखोल माळवाडी जवळील छोट्या पुलावर आलेल्या पुराच्या पाण्याच्या लोटात तथा प्रवाहात दुचाकीसकट पुल पार करत असताना, प्रथमदर्शनी सामान्य वाटणार्या पाण्याच्या प्रवाहात अचानक वाढ झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटून मोटारसायकल पाण्यातून वाहून जावू लागली. तेव्हा सतिश जाधव आणि विनोद माळकर यांनी गाडी ओढून काढण्याचा प्रयत्न केला पण पाण्याच्या तीव्र प्रवाहामुळे त्यांना अपयश येवून दुचाकी पुलावरून ओढ्यात पडली. तरीही श्री. माळकर यांनी दुचाकी सोडली नव्हती पण शेवटी पाण्याचा तीव्र प्रवाह आणि खोलीमुळे त्यांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी दुचाकी सोडून दिली आणि पोहत बाहेर आले. परंतु यामध्ये त्यांच्या पायांना आणि हाताला दुखापत झाली . यावेळी अवघ्या ६ महिन्यांपुर्वी घेतलेली नवीन मोटरसायकल डोळ्यादेखत वाहून जाताना पाहून वाहन मालकांना मात्र दु:ख होत होते. त्यानंतर त्यांनी व चाफेखोल माळवाडी येथील स्थानिक तरुणांनी ओढ्यामध्ये दुचाकी शोधण्याचा प्रयत्न केला. पण मुसळधार कोसळणारा पाऊस आणि ओढ्यातील पाण्याचा मोठा प्रवाह यामुळे पाण्यात उतरून दुचाकी शोधणे शक्य झाले नाही. त्यामुळे ओढ्याच्या कडेने शोधण्याचा सर्वांनी प्रयत्न केला पण सायंकाळी उशीरा पर्यंत दुचाकी सापडू शकली नाही.
दरम्यान आज बुधवारी १९ जुलैला सकाळी ७ वाजल्यापासून पुन्हा स्थानिक तरुण आणि नांदोस येथील तरुणांनी घटनास्थळापासून ओढ्यात दुचाकीचा शोध घेण्यास सुरुवात केली. कालच्या तुलनेने आज पाण्याचा प्रवाह कमी असल्याने शोध घेणे सोपे झाले. पाऊसाचा जोर अधून मधून असूनदेखील शेवटी तरुणांच्या अथक प्रयत्नांना यश आले. सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान पुलापासून सुमारे ५० मीटर अंतरावर दहा फूट खोल पाण्यात मोटरसायकल आढळून आली. काल सायंकाळी ४ वाजता वाहून गेलेली मोटरसायकल तब्बल १८ तासांनंतर ओढ्यात आढळून आली. त्यावेळी दुचाकीचे बर्यापैकी नुकसान झाल्याचे दिसून आले.
ही वाहून गेलेली दुचाकी शोधण्यासाठी मिलिंद जाधव, ओंकार जाधव, साईप्रसाद जाधव, गजानन जाधव, संतोष जाधव , पिंटू वरक , संकेत पाटील, गौरव चिरमुले , अक्षय ढोलम , निलेश माळकर , विशाल करावडे , नांदोसकर या तरुणांनी ओढ्यात उतरून प्रयत्न केले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)