सावळ्या विठ्ठलाच्या भेटी आला संत मेळा,उजळुनी गेला मसुरे गांवच्या भक्तीआभाळा...!
मसुरे मर्डेवाडीतील हरिनाम सप्ताहाची सात्त्विक उत्साहात सांगता…
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :विशेष वृत्त : ‘विठठल विठ्ठल गज़री अवघी दुमदुमली मसुरे नगरी……..’, हरिनामाचा गजर करत, दिंड्या पताकांच्या जयघोषात मसुरे मर्डेवाडी येथील विठ्ठल रखुमाई मंदिर हरी भक्तीत न्हाऊन निघाले … निमित्त होते ते अखंड हरिनाम सप्ताहाचे
.
स्थानीक भजनी मंडळासह विविध गावातील भजने, टोकळवाडीच्या गोफ नृत्याने उत्सवाला रंगत आणली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाचे निर्बंध पाळत कार्यक्रम पार पडले.
मसुरे पंचक्रोशी सहलगतच्या गावातील भजनी मेळ्यानी तसेच मुंबईतील विविध नामांकीत बुवानी आपली कला श्री देव विठ्ठल रखुमाई चरणी सादर केली.
हरिनाम सप्ताहाच्या अखेरच्या दोन दिवसात मसुरे टोकळवाडी येथील मंडळाने ‘राम भक्त हनुमान ’, मसुरे गडघेरावाडी मंडळाने ‘ मयासुर वध’, तर मर्डेवाडी मंडळाच्या वतीने ‘ संत बाळूमामा ’ हा देखावा सादर करण्यात आला. हरिनाम सप्ताहात सादर झालेले देखावे फटाक्यांच्या आताषबाजीमुळे व ढोल ताशांच्या दणदणाटाने सर्वांचे आकर्षण ठरले. उत्सवा निमित्त आकर्षक अशी विद्युत रोषणाई मंदिर परिसरात मेस्त्री बंधु यानी केली होती. विठू नामाच्या अखंड गजरात संपन्न झालेल्या हरिनाम सप्ताहाची सांगता उत्साहात झाली. हरिनाम सप्ताह यशस्वितेसाठी श्री विठ्ठल मंदिर ट्रस्टच्या सर्व सदस्यानी परिश्रम घेतले. संतांच्या शिकवणी ह्या त्रिकालाबाधित शाश्वत सत्याचे सिद्धांतच जणू..! समाज अंधःकार दूर करण्यासाठी संतानी विठ्ठलाच्या महात्म्याला अचूक जाणत अभंग व भजनांच्या रचना केल्या. कोकणातील ग्रामीण भागांमध्ये आज आधुनिकतेची आस असली तरी संतांच्या शिकवणीतून येणारे संस्कार हे आबालवृद्ध सर्वांनाच आयुष्यातील सदसद्विवेक बुद्धीला जागृत करायला आणि ठेवायला मदत करतात हीच विठ्ठल व हरिनामाची फलश्रुती असल्याचे भाविकांचा सहभाग व समाधान पाहिले की समजते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)