सुरेश गावडे यांनी दिला आंदोलनाचा इशारा..!
बांदा | राकेश परब : अतिशय कवडीमोल दरात शेतकऱ्यांकडून जमिनी खरेदी करून तिलारी पाटबंधारे प्रकल्पांतर्गत बांदा शाखा कालव्याचे काम गेली तीस वर्षे सुरू असून अद्याप रोणापालपर्यंत पाणी काही आले नाही. अधिकाऱ्यांनी ४२ किमीपर्यंत पाणी सोडणार असल्याचे पत्र दिले होते. परंतु त्याची अंमलबजावणी होत नसल्याने अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी विलवडे, इन्सुली, रोणापाल, पाडलोस, मडुरा, सातोसे, कास, ओटवणे गावातील शेतकरी तसेच सहकाऱ्यांना घेऊन सोमवार २० मार्च रोजी सावंतवाडी तिलारी कार्यालयावर धडक मोर्चा काढणार असल्याचा इशारा, रोणापाल माजी सरपंच सुरेश गावडे यांनी दिला.
सुरेश गावडे म्हणाले की, अल्पदरात दिलेल्या जमिनी ठेकेदार किंवा अधिकाऱ्यांचे पोट भरण्यासाठी नाही तर आम्हाला पाणी मिळावे म्हणून दिल्या. एक वर्षांपूर्वी कार्यकारी अभियंता रोहित कोरे यांना घेराव घातला होता. मात्र त्यावेळी आम्हाला पोकळ लेखी आश्वासन देत वेळ मारून नेण्याचे काम केले. तसेच पुन्हा एकदा आश्वासन दिले. परंतु आता आम्ही शेतकरी कोणत्याही आश्वासनाला बळी न पडता जोपर्यंत रोणापालपर्यंत पाणी येत नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही समस्त सहकारी शेतकऱ्यांच्यावतीने सुरेश गावडे यांनी दिला.
तसेच विसर पडलेल्या तिलारी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित कोरे यांना त्यांनी दिलेल्या पत्राची आठवण करून देत यापुढे शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळलात तर वेळप्रसंगी कार्यालयासमोरच पाण्यासाठी आमरण उपोषण छेडणार असून याला सर्वस्वी जबाबदार तिलारी विभाग राहणार असल्याचेही माजी सरपंच सुरेश गावडे यांनी सांगितले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)