आज मुंबईतील पत्रकार काळ्या फिती लावून निदर्शने करणार..!
मुंबई | ब्युरो न्यूज : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरचे पत्रकार शशिकांत वारीशे यांची झालेली निर्घृण हत्या झाल्याचा आरोप करुन आणि राज्यातील पत्रकारांवर दिवसेंदिवस होत असलेले हल्ले, ह्या व अशा सर्व घटनांचा निषेध करण्यासाठी आज १० फेब्रुवारीला दुपारी १२ वाजता मुंबईतील पत्रकार काळ्या फिती लावून मंत्रालयाजवळील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ मूक निदर्शने करणार आहेत.
काल मुंबईतील पत्रकारांच्या विविध संघटनांची बैठक मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वार्ताहर कक्षात पार पडली. या बैठकीत मूक निदर्शन करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.
मुंबईतील पत्रकार संघटनांनी या निदर्शनामध्ये सहभागी व्हावे, असे सर्व संघटनांच्या प्रमुखांनी आवाहन केले आहे. आजच्या बैठकीत शशिकांत वारीशे निर्घृण हत्या आरोप प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयामार्फत चालवावा तसेच वारीशे यांची हत्येचा आरोपी पंढरीनाथ आंबेरकर याची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता त्यांना मोक्का लावावा आणि हा खटला चालविण्यासाठी विशेष सरकारी वकील नियुक्त करावेत आणि वारीशे यांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता त्यांना ५० लाख रुपये सरकारने मदत द्यावी अशे मागण्या कालच्या बैठकीत करण्यात आल्या.
या बैठकीला मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, मुंबई मराठी पत्रकार संघाचे विश्वस्त राही भिडे, अध्यक्ष नरेंद्र वि. वाबळे, संयुक्त कार्यवाह विष्णू सोनवणे, बीयूजेचे इंदरकुमार जैन, मंत्रालय-विधीमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे, कार्यवाह प्रवीण पुरो, भगवान परब, म्हाडा पत्रकार संघाचे अध्यक्ष दीपक पवार, मराठी पत्रकार परिषदेचे विभागीय सचिव दीपक कैतके, अध्यक्ष राजा अदाटे, महानगर पालिका वार्ताहर संघाचे श्रीरंग सुर्वे, मुंबई क्राईम रिपोर्टर असोसिएशनचे अध्यक्ष विशाल सिंह, आशिष सिंह, पत्रकार सुधाकर काश्यप, बारसु रिफायनरी विरोधी आंदोलनातील प्रतिनिधी सचिन चव्हाण, नरेंद्र जोशी आदी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)