बेदरकार वाहन चालकांवर कारवाईची मागणी!
यशराज प्रेरणा ग्रुपने दिले आचरा पोलिसांना निवेदन
विवेक परब / ब्यूरो चिफ:आचरा तिठा येथे होणारी वाहतूक कोंडी, कर्णकर्कश बुलेटचा कानठळ्या बसवणारा आवाज तसेच बेदरकारपणे दुचाकी चालवणारी शाळकरी मुले आदी विषयांवर लक्ष वेधत आचरा येथील यशराज प्रेरणा संघटनेच्या माध्यमातून आचरा पोलिसांना निवेदन देत कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. याबाबत पोलीस हवालदार स्वाती आचरेकर यांच्याकडे निवेदन सादर केले. यावेळी यशराज प्रेरणाचे अध्यक्ष मंदार सरजोशी, ऍड. उर्मिला आचरेकर, सुगंधी कांदळगावकर, धनश्री आचरेकर, मानसी सरजोशी, बाबाजी भिसळे, स्वप्नील गोसावी, गणेश आचरेकर, रोहित भिरवंडेकर आदी सदस्य उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे, आचरा हे गाव बाजार व्यापाराच्या दृष्टीने मध्यवर्ती ठिकाण आहे. त्यामुळे गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेला आचरा तिठा परिसरात सातत्याने वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे आचरा तिठा परिसरात कायमस्वरूपी वाहतूक पोलीस कामगिरीवर ठेवण्यात यावेत. आचरा गावात पंचक्रोशामधून आचरा हायस्कूल, महाविद्यालयामध्ये जाण्यासाठी मुले येतात. यात बरेच जण दुचाकींचा वापर करतात. दुचाकी चालविणारी मुले ही अठरा वर्षाखालील असून भरधाव वेगात दुचाकी चालवत असल्याने अपघात घडण्याची शक्यता आहे. पर्यटन हंगाम असल्याने आचरा-मालवण मार्गावर पर्यटकांच्या वाहनांची रेलचेल असते. त्यामुळे अल्पवयीन मुले दुचाकी चालवत अपघाताला निमंत्रण देत आहेत. आचरा पोलिसांकडून वाहतूक कारवाई मोहीम थंडावल्याने बुलेटस्वार, अल्पवयीन मुलांना कायद्याची भीती राहिली नाही. त्यामुळे पोलिसांनी ऍक्शन मोड मध्ये येऊन कारवाई सत्र सुरू करावे. याबाबत जनजागृतीपर फलक लावून वाहनधारकांना सतर्क करावे, असे निवेदनात म्हटले आहे. आचरा परिसरातील अनेक युवा वर्गात बुलेट, तसेच यामाहा सारख्या गाड्यांचे मूळ सायलेंसर काढून मोडिफाय करण्याच्या प्रयत्नात अत्यंत कर्णकर्कश असे ध्वनीप्रदूषण करणारे पटाका सायलेंसर लावले गेले आहेत. अशा वाहन चालकावर दुसरा सायलेंसर लावून ध्वनी प्रदूषण केल्याप्रकरणी चालकाना वाहतूक नियामन्वये शिक्षा करावी. बुलेटच्या कर्णकर्कश आवाजाने ज्येष्ठ नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)