सिंधुदुर्गात प्रथमच भव्य दिव्य अशा १७ फूट उंची असलेल्या मारुती मूर्तीची स्थापना
विवेक परब/ ब्यूरो चिफ: आचरा येथील निलेश नंदकुमार सरजोशी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या आचरा देवराई परिसरात ४ जानेवारीला श्री मारुतीच्या भव्य दिव्य मूर्तीची स्थापना करण्यात आली. मूर्तीचे सुवासिनींनी औक्षण करून स्वागत केले. सचिन केळकर यांनी पंचगव्याने मूर्तीचे शुद्धीकरण केले. मूर्तीची विधिवत पूजा कु. ऋग्वेद सरजोशी यांच्या हस्ते करण्यात आली. नंतर देवाला गाऱ्हाणे प्रार्थना करून श्री मारुती स्तोत्र पठण करत मूर्ती स्थापना करण्यात आली. सावंतवाडी येथील सुप्रसिद्ध मूर्तिकार विलास मांजरेकर व ओमकार मांजरेकर या पिता पुत्रांनी ही मूर्ती तयार केली. त्यांचा निलेश सरजोशी आणि कुटुंबीय यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ , भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. सिंधुदुर्गात प्रथमच एवढी महाकाय मूर्ती स्थापन होत असल्याचे मांजरेकर यांनी यावेळी बोलताना सांगितले. उपस्थित सर्वांना तीर्थ, प्रसाद वाटप करण्यात आला. देवराई परिसरात येत्या काही काळातच नवग्रह मंदिर बांधून पूर्ण होणार आहे. देवराईतील औषधी वनस्पती, देव वृक्ष, नवग्रह मंदिर आणि साथीला आजची श्रीं ची भव्य आणि दिव्य मूर्ती भविष्यात पर्यटकांना नक्कीच आकर्षण ठरेल असे उद्गार यावेळी प्रत्येकाच्या मुखातून निघत होते. या सोहळ्याला आचरा गावचे प्रमुख मानकरी विनीत मिराशी, कपिल गुरव, मुकुंद घाडी, दशरथ घाडी, रमेश पुजारे, गावकर, अरविंद सावंत, आशिष सावंत यांसहजगदीश तावडे, पवन पराडकर आदी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)