अटल प्रतिष्ठानच्या 'अटल गौरव पुरस्कारांची' घोषणा.
८ जानेवारीला विशेष कार्यक्रमात होणार पुरस्कारांचे वितरण.
सावंतवाडी | ब्युरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीत गेली दोन दशके सिंधुदुर्ग जिल्ह्यात सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या आणि भारतरत्न अटलबिहारी वाजपेयींच्या नावे स्थापन झालेल्या ‘अटल प्रतिष्ठान’ न्यासाच्यावतीने १९ व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या दहा व्यक्तींना ‘अटल गौरव पुरस्कार २०२३’ जाहीर करण्यात आल्याची माहिती अटल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष ॲड. नकुल पार्सेकर व कार्यवाह डॉ. राजशेखर कार्लेकर यांनी दिली.
८ जानेवारी रोजी एका विशेष कार्यक्रमात या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. समाजाच्या विविध घटकांसाठी स्नेहालयाच्या माध्यमातून काम करणारे स्नेहालय अहमदनगरचे संस्थापक अध्यक्ष डॉ. गिरीश कुलकर्णी, कोकणातील गरीब व गरजू रुग्णांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध व्हाव्या यासाठी धडपड करणारे डॉ. अमेय देसाई, मुंबई- पुण्यामध्ये दलित, शोषित, दिव्यांग, वंचित घटकांसाठी अहोरात्र झटणारे पुण्याचे ज्ञानेश्वर उर्फ माउली दारवटकर, इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये सामाजीक जाणीवेसोबतच स्वतःचा वैचारीक ठसा उमटवणारे ऋषी देसाई, लेखिका, कवयित्री सौ. उषा परब, दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या पत्रकारितेचा आदर्श वारसा जपणारे पत्रकार शिवप्रसाद देसाई, अतिशय प्रतिकुल परिस्थितीत संषर्घ करून जिल्ह्याच्या उद्योग जगतात यशस्वी वाटचाल करणारे यशस्वी उद्योजक
राजेंद्र केसरकर, कुडाळ, शिक्षण क्षेत्रात योगदान देत असलेले आणि बॅ. नाथ पै यांच्या विचारांचा वारसा जोपासणारे उमेश गाळवणकर, आपल्या आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणारे उदय आईर, मेहनती कलाप्रेमी साईनाथ जळवी अशा दहाजणांना गौरविण्यात येणार आहे.
८ जानेवारी रोजी राजवाडा- सावंतवाडी येथे सायंकाळी चार वाजता हा गौरव सोहळा होणार आहे. यावेळी अटलच्या राष्ट्रसाधना या स्मरणिकेचे प्रकाशन, सिंधुदुर्ग कन्या, नृत्यांगना व वयम् डान्स स्टुडिओ पुणेच्या संचालिका सौ. स्नेहल पार्सेकर हिने संरचित केलेला भरतनाट्यम नृत्याविष्कार तसेच शिशुवाटिकेच्या चिमुकल्यांचाही कार्यक्रम होणार आहे. यावेळी मानव संसाधन विकास संस्थेच्या अध्यक्षा सौ. उमा सुरेश प्रभू संयुक्त सचिव ॲटोमिक एनर्जी भारत सरकारच्या सौ. सुषमा तायशेटे, स्नेहालय अहमदनगरचे संस्थापक अध्यक्ष डॉ. गिरीश कुलकर्णी, सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले, सौ. शुभदादेवी भोसले राणी सरकार आदी उपस्थित राहणार आहेत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)