सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसाचा तडाखा..!
अवकाळी पावसामुळे आंबा काजू बागायतदार चिंतेत.
संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले दोन दिवस पावसाळी ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यात उष्मा पण वाढला होता. आणि अचानक पावसाच्या हलक्याशा सरी कोसळत असताना सोमवारी सायंकाळी मात्र विजांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झाला. जिल्ह्याच्या सर्वच भागात अवकाळी पावसाने झोडपून काढल्याने त्याचा जनजीवनावर परिणाम झाला होता. ऐन थंडीच्या हंगामात जोरदार पाऊस झाल्याने त्याचा आंबा काजू बागायतीवर मोठा परिणाम होणार आहे.
तसेच पावसाळी व उन्हाळी शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनाही त्याचा फटका बसणार आहे.सिंधुदुर्गात गेले आठवडाभर ढगाळ वातावरण होते. त्यातच काही भागात अधून मधून हलक्याशा सरी कोसळत होत्या.मात्र ढगाळ वातावरण कायम असल्याने व उष्णतेचे प्रमाण वाढलेले असल्याने पाऊस पडण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती .आठवडाभर असेच वातावरण कायम असताना सोमवारी सायंकाळी मात्र अवकाळी पावसाच्या जोरदार सरी कोसळू लागल्या. वारा पाऊस आणि त्यासोबतच विजांचा गडगडाट सुमारे तासभर सुरू होता. अचानक जोरदार पाऊस सुरू झाल्याने शहरी भागातील व्यापारी विक्रेते यांची एकच धावपळ झाली. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनाही वैरण व इतर शेती विषयक कामांसाठी धावाधाव करावी लागली. मात्र पावसाचा जोर वाढलेला असल्याने त्याचा फटका सर्वानाच बसला. जोरदार पाऊस झाल्याने अनेक भागातील रस्ते जलमय झाले होते. त्यातूनच वाहने ये जा करत होती. उन्हाळ्यात अचानक पाऊस झाल्याने नोकरी व्यवसायानिमित्त शहरात आलेल्या नागरिकांची एकच तारांबळ उडाली. घरी परतण्याच्या वेळातच पाऊस झाल्याने व त्यातच छत्री रेनकोट सोबत नसल्याने अनेकानी भिजतच घर गाठले तर काहींनी मिळेल तेथे आडोसा घेतला होता.सायंकाळ नंतर पावसाचा जोर काहीसा कमी झाला होता.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)