चौके-कुडाळ मार्गावर दुचाकीला अपघात ; महिला जखमी..!
वाहन चालक व स्थानिकांतून व्यक्त होतोय संताप.
चौके | अमोल गोसावी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या ‘चौके धामापूर कुडाळ’ मार्गावर काळसे येथे श्री. देव रवळनाथ मंदिर ते आजगांवकर इको स्टोअर दरम्यानच्या मुख्य रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघातांची संख्या वाढली आहे.
काल गुरुवारी २४ नोव्हेंबरला दुपारी या रस्त्यावरील भल्यामोठ्या खड्ड्यांमुळे एका दुचाकी चालकाचा वाहनावरील ताबा सुटून अपघात झाला आणि त्यामध्ये दुचाकीवर मागे बसलेल्या सौ. साक्षी शंकर पाटील (काळसे ,चुडनाईकवाडी) या तोल जाऊन रस्त्यावर पडल्या. त्यांच्या डोक्याला दुखापत होऊन जखमी झाल्या आहेत. कुडाळ ग्रामीण रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत.
साक्षी पाटील यांच्या अपघातानंतर स्थानिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभाराविरोधात रोष व्यक्त केला आहे. रवळनाथ मंदिर ते आजगांवकर इको स्टोअर या दरम्यानच्या मुख्य रस्त्यावर गेल्या काही महिन्यांपासून अनेक खड्डे पडले आहेत. गणेश चतुर्थी पुर्वी सदर खड्डे सिमेंटने बुजवण्याचा प्रयत्न झाला परंतु पुढील आठ दिवसातच ते खड्डे पूर्ववत झाले. आता त्याठिकाणच्या खड्ड्यांमध्ये पूर्वीपेक्षा जास्त वाढ झालेली आहे. त्याचा या मार्गावरुन येणाऱ्या जाणाऱ्या शेकडो छोट्या मोठ्या वाहनांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने सदरील खड्डे बुजवावेत अशी मागणी होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)