'कोकण सारथी' सागरी नौका भ्रमण मोहिमेचा शुभारंभ……!
मुंबई | ब्यूरो न्यूज :
महाराष्ट्र दोन नेव्हल एनसीसी रत्नागिरी विभागातर्फे ‘कोकण सारथी’ सागरी नौका भ्रमण मोहिमेचा शुभारंभ मंगळवारी भगवती बंदर येथून झाला. महाराष्ट्र राज्य एन.सी.सी.चे संचालक मेजर जनरल वाय. पी. खंडुरी यांनी सागरी मोहिमेला झेंडा दाखविला व सहभागी सर्व छात्रांना मोहिमेसाठी शुभेच्छा दिल्या. मोहिमेत रत्नागिरी, कोल्हापूर, सावंतवाडी, मुंबई, पुणे, नागपूर येथील नौसेना, स्थलसेना, वायूसेना मधील ६० छात्र सहभागी झाले आहेत. मंगळवारी (दिनांक १५) मोहिमेचा शुभारंभ झाला असून २४ नोव्हेंबर रोजी सांगता होणार आहे. या मोहिमेतंर्गत ‘प्लास्टिक मुक्त’ समुद्र किनाऱ्यांबाबत पथनाट्याव्दारे संदेश देण्यात येणार आहे. या सागरी नौका भ्रमण मोहिमेत एन.सी.सी अधिकारी, २५ मुली व ३५ मुलगे मिळून एकूण ६० छात्र सहभागी झाले आहेत. नौका भ्रमण मोहिमेत २७ फूट सेलिंग व्हेलर तीन बोटी, शिडाच्या नौका, व छात्र सैनिकांच्या सुरक्षततेच्या दृष्टीकोनातून एक मोठी मच्छिमार नौका व दोन मध्यम यांत्रिक बोट सहभागी झाली आहे. सागरी नौका भ्रमण मोहिमेच्या शुभारंभ कार्यक्रमात मुंबईचे संचालक ब्रिगेडियर सुबोजित लहीरी, ब्रिगेडीयर समीर साळुंखे, कमांडिंग ऑफीसर के. राजेश कुमार उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)