तोरसोळे-जुवळेवाडी येथील ग्रामस्थांचे ४ नोव्हेंबरला उपोषण..!
नैसर्गिक पाण्याचा स्तोत्र दूषित होत असल्याने चिरेखाण बंद करण्याची मागणी.
संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
देवगड तालुक्यातील तोरसोळे-जुवळेवाडी येथील ग्रामस्थांनी चिरेखाणीमुळे पिण्याच्या पाण्याचा नैसर्गिक स्तोत्र कायमचा नष्ट होणार असल्याबाबत केलेल्या तक्रारीवर प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नसल्यामुळे नाराजी व्यक्त केली असून याबाबत ४ नोव्हेंबरला उपोषणास बसण्याचा इशारा लेखी निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
तोरसोळे-जुवळेवाडी येथे पिण्याच्या पाण्याची विहीर नाही.येथे नैसर्गिक पाण्याचा स्तोत्र म्हणून एकमेव झरा आहे. या झऱ्याच्या पाण्याचा उपयोग येथील ग्रामस्थ पिण्यासाठी आणि उन्हाळी-पावसाळी शेतीसाठी करतात. नैसर्गिक पाणी स्तोत्राच्या जवळच विनापरवाना चिरेखाण व्यवसाय सुरू करण्यात आला असून त्या खाणीची माती,धूळ,कचरा व तेथे काम करणाऱ्या मजुरांचे मलमूत्र पावसाच्या पाण्याने या झऱ्याकडे येते त्यामुळे पिण्याचे पाणी दूषित होत असून चिरेखाणीतील धूळ व मातीमुळे झरा व पाण्याचा पाट गाळ साचून बंद होणार असून नैसर्गिक पाण्याचा स्तोत्र नष्ट होणार असल्यामुळे भविष्यात ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण होणार आहे.सदरची चिरेखाण तात्काळ बंद करण्यात यावी अशी मागणी येथील ग्रामस्थांनी २७ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी महसूल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती.
ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारी अर्जाची उपविभागीय अधिकारी कणकवली यांनी तात्काळ दखल घेत तहसीलदार देवगड यांना तक्रारीतील वस्तुस्थितीबाबत तात्काळ स्थळपहाणी करून कोणत्याही प्रकारचे गौणखनिज उत्खनन/ वाहतुकीमुळे तोरसोळे-जुवळेवाडी येथील पाण्याचे स्तोत्र दुषित होत असल्याचे आढळल्यास संबंधितांना सदर उत्खनन तात्काळ थांबविण्याबाबत सूचना द्याव्यात तसेच सदर उत्खनन हे विनापरवाना होत असल्याचे दिसून आल्यास त्याबाबतची मोजमापे घेऊन संबंधितावर नियमाधीन दंडात्मक कारवाई करावी त्याचप्रमाणे केलेल्या कारवाईबाबत अर्जदार यांना कळवून त्याची प्रत उपविभागीय अधिकारी कार्यालयास माहितीसाठी सादर करावी तसेच आपले कार्यक्षेत्रात कोणत्याही परिस्थितीत अवैद्य गौणखनिज उत्खनन /वाहतूक होणार नाही व त्यामुळे जनतेला कोणत्याही त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी असे ६ ऑक्टोबर रोजी लेखी पत्राद्वारे कळविले आहे.
उपविभागीय अधिकारी कणकवली यांनी कळवून सुद्धा तोरसोळे-जुवळेवाडी येथील चिरेखाण अद्यापही सुरू आहे.संबंधितांवर तहसीलदार यांनी केलेल्या कारवाईबाबतची लेखी माहिती तक्रारदार ग्रामस्थांना मिळालेली नाही.त्यामुळे तोरसोळे जुवळेवाडी येथील ग्रामस्थांनी ४ नोव्हेंबर रोजी देवगड तहसीलदार कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचे लेखी निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले असून त्याच्या प्रती जिल्हाधिकारी,जिल्हा पोलीस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी,पोलीस ठाणे देवगड,सरपंच तोरसोळे यांना देण्यात आल्या आहेत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)