सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिवंगत विनायक मेटे व सायरस मिस्त्री यांच्या सारख्या अपघाती घटनांना टाळण्याची खबरदारी आवश्यक.
जनता दल मुंबईचे विद्यमान अध्यक्ष प्रभाकर नारकर यांनी वेधले लक्ष…!
संतोष साळसकर | ब्युरोचीफ : महाराष्ट्र राज्यामधून जाणार्या महामार्गांवरुन , आधी विनायक मेटे आणि नुकतेच उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या झालेल्या मृत्यूमुळे रस्त्यांवर होणारे अपघात चर्चेत आले आहेत.
याविषयी जनता दल ,मुंबईचे विद्यमान अध्यक्ष प्रभाकर नारकर यांनी सामाजिक डिजीटल मंचावर एक फोटो सामाईक करुन त्याविषयी रस्ते विभागाला काही प्रतिबंधात्मक सूचना केल्या आहेत.
या बातमीला जोडलेले छायाचित्र हे मुंबई-गोवा महामार्गावरील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील कासार्डे गावातील आहे. मुंबईकडे येताना कासार्डे तिठ्यावरील उड्डाण पुलावरून तळेऱ्याच्या बाजूला उतरताना पहिली मार्गिका ही अशी चंद्रकोरीच्या आकारात कापण्यात आली आहे.
विशेषतः रात्रीच्या वेळी ट्रक सारखे वाहन पहिल्या मार्गिकेवरून वेगाने आल्यास पुढे रस्ताच नाही हे लक्षात न आल्याने किमान दीड ते दोन फूट खाली असलेल्या सर्विस रोडवर उलटण्याची शक्यता आहे. याठिकाणी सर्विस रोड सरळ रेषेत पुढे आणून पुलाच्या तिन्ही मार्गिका नीट बांधणे शक्य होते व ही दुरुस्ती अजूनही करता येईल. कारण सर्विस रोडला लागून एक छोटे झाड वगळता कोणतेही बांधकाम नाही याची वेळीच दखल घेऊन रस्ते विभागाने तातडीने ही दुरुस्ती करावी अन्यथा कासार्डे उड्डाण पुल हा अपघातासाठी केलेली व्यवस्थाच ठरेल असे प्रभाकर नारकर यांनी स्पष्ट करत एका संभाव्य समस्येकडे लक्ष वेधले आहे.
(श्री प्रभाकर नारकर यांनी सामाजिक डिजीटल मंचावर सामाईक केलेले छायाचित्र.)
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)