पत्रकार महेंद्र पराडकर वाढदिवस विशेष. ( संपादकीय)
मालवण | संपादकीय : जुन्या नव्या विचार दिशांचे सूर्य एकाच ठिकाणी येऊन मध्यान्ह केलेला काळ म्हणजे साल 2000 चे दशक. मालवण शहरातील दांडी वरचा एक हरहुन्नरी युवक त्याच्या किशोरावस्थेला तसा वाया घालवू इच्छित नव्हता.
विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग घेऊन त्यात शंभर टक्के योगदान देऊ पहाणारा तो त्याच्या ‘दक्षिण मालवणी’ समुद्र कृतज्ञ संस्कृतीलाही विश्वपटलावर कसे नेता येईल असा विचार करत सामाजीक बांधिलकीचे प्रकल्प अभ्यासू लागला.
प्रथमदर्शनी भीडस्त व अबोल भासणारा तो विचारी युवक त्याच्या क्रिकेट खेळातील सहभागामुळे मालवण शहर व ग्रामीण भागात परिचीत होत गेला. परिचय त्याचा जितका होत होता तितकाच त्यालाही मालवण शहर व ग्रामीण भागातील सर्व घटकांचा होत होता.
नीटनेटकी शिस्तबद्धता हा त्याच्या व्यक्तिमत्वालीत जमेची बाजू असल्याने अगदी छोट्या छोट्या घटकांचे मुद्दे त्याच्या मेंदूतील विविध कप्प्यांमध्ये छानपैकी रचले जाऊ लागले आणि तिथेच त्याच्यात एक पत्रकार जन्म घेऊ लागला .
मुद्देसूद मेंदूला लेखणीची साथ आणि सोबतच समाजाशी तटस्थ सुसंवाद साधायची त्याची ऊपजत कला यामुळे त्याला पत्रकारीता क्षेत्रामध्ये ‘विशेष प्रशिक्षण’ घ्यावे लागले नाही. आपल्या सोबतच्या विविध माध्यमांतील समकालीन व ज्येष्ठांसोबत चालता चालता तो घडत जात होता.
त्याच्या माय भूमीच्या ‘चंदेरी वाळू’ सारखे त्याचे व्यक्तता व परावर्तनशील मन आता संयत लेखणी आणि पत्रकारितेची दृष्टी या दोघांसाठीही पूरक असे लेखन,वाचन आणि एकूणच शिस्तबद्ध जीवन जगू लागले.
एखाद्या गोष्टीवर लगेच प्रतिक्रियि देण्यापेक्षा त्या गोष्टीतील तर्क,मर्म आणि फ़लीत यांचे समीकरण घालण्याचा विवेक त्याच्यात जोपासला गेला आणि आजच्या घडीला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारीतेतील एक विश्वासू नांव ‘पत्रकार महेंद्र पराडकर’ म्हणून जनमानस त्याला ओळखतात.
इस्त्रिचा इन केलेला शर्ट,फाॅर्मल पॅन्ट घातलेला हा एक समुद्र कृतज्ञ पत्रकार माणुस जेंव्हा दांडीच्या चंदेरी किनार्यावरुन छत्रपतींच्या किल्ले सिंधुदुर्गला न्याहाळत असतो ना तोच त्याचा सर्वोत्तम आनंद क्षण असतो…अगदी कॅमेर्यात टिपून ठेवण्यासारखा.
आपल्या दांडीवरील व एकूणच किनारपट्टीवरील सर्व बांधवांचे कष्ट त्याच्या मनात खोल असतात व त्यासाठी काहीतरी ठोस करायची छोटी छोटी कृतीशील पावले तो यथाशक्ती टाकत असतोच परंतु सोबतच पत्रकार म्हणून स्विकारलेल्या कर्तव्याची त्याची नांव तो अगदी स्थीर ठेवतो हे विशेष.
पत्रकार महेंद्र पराडकर यांचा आज वाढदिवस. आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल समूहातर्फे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
सुयोग पंडित ( मुख्य संपादक | आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल)
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)