कोकण रेल्वे मार्गावरील मडुरा स्थानकावर सर्व गणपती स्पेशल गाड्यांना थांबा मिळावा म्हणून निवेदन.
बांदा |राकेश परब :
कोकण रेल्वे मार्गावरील मडुरा स्थानकावर सर्व गणपती स्पेशल गाड्यांना थांबा मिळावा अशी मागणी भाजपचे मडुरा शक्तीकेंद्र प्रमुख यशवंत माधव यांनी कोरे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. याबाबतचे निवेदन बेलापूर येथील कोरेच्या प्रधान कार्यालयात लिपीक अमोल कदम यांच्याकडे सुपूर्द केले. गाड्यांना थांबा मिळण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आल्याची माहिती यशवंत माधव यांनी दिली. तसेच केंद्रीय सुक्ष्म लघु व मध्यम उद्योगमंत्री ना. नारायण राणे यांनाही हे निवेदन सादर केले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, कोकण रेल्वे मार्गावरील मडुरा हे महाराष्ट्रातील शेवटचे स्थानक आहे. सदर स्थानक दशक्रोशीसह बांदा, दोडामार्ग तालुक्यातील बहुतांशी गावासासह गोव्यातील पेडणे तालुक्यातील काही गावांसाठीही हे जवळचे स्टेशन आहे. या स्टेशनवर सध्या दिवा – सावंतवाडी व रत्नागिरी – मडगाव पॅसेंजर शिवाय कोणतीही एक्सप्रेस गाडी थांबत नाही. हे स्टेशन केवळ क्रॉसिंग स्टेशन बनले आहे.
ते पुढे म्हणतात, कोकण रेल्वेचा मडुरा स्टेशनवर अवलंबून असलेल्या सुमारे ४० गावांना फारसा फायदा नाही. या स्टेशनवर कोकणकन्या एक्सप्रेसला थांबा मिळावा. तसेच तुतारी एक्सप्रेस सावंतवाडी ऐवजी मडुरा स्टेशनवरुन सोडण्याची मागणी कोरे प्रशासनाकडे प्रलंबित आहे. गेली बरीच वर्षे गणपती स्पेशल गाड्यांना मडुरा स्टेशनवर थांबा दिला जात होता. त्यामुळे ग्रामीण भागातील चाकरमान्यांची चांगली सोय झाली होती. मात्र, गेली दोन वर्षे कोरोनाचे कारण पुढे करुन गणपती स्पेशल गाड्यांनाही थांबा दिला जात नाही. हा एकप्रकारे कोकणी जनतेवर कोरे प्रशासनाने चालविलेला अन्यायच असल्याची टीका केली आहे.
कोकण रेल्वेचा कोकणसाठी किती फायदा झाला हा प्रश्न आजही वादातीत आहे. गणपती स्पेशल गाड्यांना थांबा नाकारुन कोरे प्रशासनाने अन्यायाचा कळसच केला आहे. ग्रामीण भागातील चाकरमान्यांना सावंतवाडी किंवा पेडणे स्थानकावरुन घरी पोचण्यासाठी पाचशे हून अधिक रुपये मोजावे लागतात. कोरे प्रशासनाच्या अन्यायी धोरणामुळे त्यांना नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असल्याचे म्हटले आहे.
गणपती स्पेशल सर्व गाड्यांना मडुरा स्टेशनवर थांबा देण्यासाठी त्वरीत सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. अन्यथा कोणतीही नोटीस न देता १५ ऑगस्ट रोजी समस्त नागरिकांसमवेत मडुरा स्टेशन आवारात बेमुदत उपोषण छेडण्याचा इशारा दिला आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)