ओझर विद्यामंदिरमध्ये दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव!
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : ओझर विद्यामंदिर कांदळगाव प्रशालेमधून मार्च २०२२ च्या शालान्त परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ ओझर विद्यामंदिरचे माजी विद्यार्थी तथा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक प्रशांत पारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच ओझर विद्यामंदिरच्या बहुउद्देशीय सभागृहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रशालेचे मुख्याध्यापक प्रतापराव खोत यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व प्रास्ताविक केले. त्यानंतर शंभर टक्के निकालाची परंपरा राखणाऱ्या सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा भेटवस्तू देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला. प्रमुख अतिथी प्रशांत पारकर यांनी प्रत्येक उत्तीर्ण विद्यार्थ्याला रोख शंभर रुपयाचे पारितोषिक देऊन गौरव केला. ‘बिकट परिस्थितीवर स्वकष्टाने मात करून यश संपादन करता येते’, हे प्रशांत पारकर यांनी स्वानुभवाचे दाखले देत कथन केले. दानशूर व्यक्तिमत्व असलेले प्रशांत पारकर यांनी यापूर्वीही शाळेसाठी अनेक स्वरूपात योगदान दिलेले आहे. प्रशाले मधून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेली आर्या पारकर हिने सत्कारमूर्तींच्या वतीने आपले मनोगत व्यक्त करताना यापुढेही शाळेचा निकाल दर्जेदार राखण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन केले. यावर्षी दहावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांमधून निष्ठा कांबळी आणि रितू पाल यांनी दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देताना ‘आम्हीही शाळेच्या उज्वल निकालाची परंपरा कायम ठेवू’, असे वचन दिले. शालेय समितीचे अध्यक्ष किशोर नरे यांनीही उत्तीर्ण विद्यार्थ्यांचं अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी शालेय समितीचे सदस्य श्रीराम परब, राजेंद्र सुतार तसेच प्रशालेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक पी. के. राणे यांनी केले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)