बांदा-शिरोडा मार्गावरील खड्डे बुजवण्याच्या नावाखाली मलमपट्टी जागृत ग्रामस्थांनी रोखली.
बांदा | राकेश परब :
बांदा-शिरोडा मार्गावरील पाडलोस केणीवाडामध्ये खड्डे बुजवण्याच्या नावाखाली दगड व मातीच्या साहाय्याने सुरू असलेली मलमपट्टी जागृत ग्रामस्थांनी रोखली. शासनाचा निधी असा खड्ड्यात वाया जात असल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रथम बुजवलेल्या खड्ड्यांची पाहणी करून पुढील निर्णय घ्यावा अन्यथा ग्रामस्थांसह प्रवाशांच्या रोषाला अधिकाऱ्यांना सामोरे जावे लागेल असा इशारा उपस्थित ग्रामस्थांनी दिला.
गतकाळात अशाच प्रकारच्या कामांमुळे अनेक अपघात घडल्याने ग्रामस्थ पुढे सरसावले. यावेळी पाडलोस तंटामुक्त समिती माजी अध्यक्ष महेश कुबल, पाडलोस सिंधू दुग्ध संस्था अध्यक्ष अर्जुन कुबल, सचिव आनंद कुबल, आरोस सोसायटी संचालक बाबल परब, सामाजिक कार्यकर्ते श्रीधर परब, अमोल नाईक, पप्पू कुबल, लाडू परब, एकनाथ कुबल आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
धोकादायक खड्ड्यांत दगड घातल्याने दुचाकी पंक्चर होण्याचे प्रकार अधिक होत आहेत. अशा दर्जाहीन कामामुळे सर्वसामान्य नागरिकांसह प्रवाशांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे काम सुरू असताना कर्मचाऱ्यांबरोबर सार्वजनिक बांधकाम विभागाचा अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित असावा असे पाडलोस तंटामुक्त समिती माजी अध्यक्ष महेश कुबल यांनी सांगितले. तसेच धोकादायक काम न करता दर्जेदार काम करून रस्ता निर्धोक करावा असे अमोल नाईक यांनी सांगितले. तर अशाप्रकारच्या बुजविलेल्या खड्ड्यात अपघात झाल्यास जबाबदार कोण असा सवालही श्रीधर परब यांनी केला.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)