मधुसूदन नानिवडेकर काव्य पुरस्कार डॉ अमूल पावसकर यांना सावंतवाडीत प्रदान.
विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट :
मधुसूदन हा आनंदयात्री होता. त्याला उदासीन कविता आवडत नसत. हसत खेळत राहणारा तो कवी होता. त्याच्या आयुष्यात संघर्ष होता पण त्याचा उल्लेख तो कधी करत नसे. मानपानासाठी हपापलेला कवी तो नव्हता. त्याच्या कविता मनात रेंगाळणाऱ्या आहेत अशी आदरांजली ज्येष्ठ साहित्यिक संध्या तांबे यानी कै मधुसूदन नानिवडेकर यांच्या प्रथम स्मृतीदिनाच्या पूर्वसंध्येला सिंधुवैभव साहित्य समूहाच्या मधुसूदन नानिवडेकर काव्य पुरस्कार कार्यक्रमात वाहिली. हा पुरस्कार डॉ अमूल पावसकर याना प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व समीक्षा होळकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी उपस्थित कवी व माजी गटविकास अधिकारी भास्कर पावसकर यांनी बोलताना माझी दोन मुले म्हणजे माझे काव्यसंग्रह असून डॉ अमूल यांना अमेरिकेला जायची संधी होती पण आम्ही ठामपणे सिंधुदुर्ग मध्येच थांबून त्याने इथल्या जनतेला सेवा द्यावी असा निर्णय घेतला अशी माहिती दिली.
डॉ सतीश पवार यांनी मृगजळ या काव्यसंग्रहाचे रसग्रहण केले. सत्काराला उत्तर देताना माझ्यासाठी हा अभिमानाचा क्षण आहे की मधुसूदन नानिवडेकर नावाचा पुरस्कार समीक्षा होळकर या प्रेरणादायी व्यक्तीकडून मला मिळत आहे . मी उशीरा काव्यलेखनास सुरुवात केली. माझ्या संपर्कात येणारे पेशन्ट व माझे बाबा कवी भास्कर पावसकर या माझ्या प्रेरणा आहेत असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमात स्नेहलता राणे सरंगले व नानिवडेकर यांच्या कन्या अपूर्वा यांनी ऑनलाइन सहभाग घेतला. चेतन पवार व समीर ठुकरुल यांनी तांत्रिक बाबी सांभाळल्या.
सूत्रसंचालक साहित्यिका सरिता पवार यांनी मधुसूदन नानिवडेकर यांच्या कवीतांची कार्यक्रमभर पखरण केली व जणू नानिवडेकर स्वतःच आपल्या कविता सादर करत आहेत असा भास झाला.
समीक्षा होळकर या आपले अपूर्ण राहिलेले शिक्षण पूर्ण करायच्या जिद्दीने आपल्या मुलीसोबत अभ्यास करून यावर्षी दहावी झालेल्या प्रेरणादायी कामकरी महिला. त्यांच्या हस्ते या पुरस्काराचे प्रदान डॉ अमूल पावसकर याना करण्यात आले. याप्रसंगी डॉ कादंबरी पावसकर व डॉ नितीन पावसकर हेही उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन सुरेश पवार यांनी केले.
डॉ अमूल पावसकर हे सावंतवाडी येथील कवी व सर्जन असून त्यांचे तीन काव्यसंग्रह प्रसिध्द झाले आहेत. त्यांचे ग्रामीण भागातील सर्जरी या विषयावरील संशोधन लांसेट, हार्वर्ड या जगप्रसिद्ध विद्यापीठ मध्ये प्रसिध्द झाले असून जागतिक आरोग्य संघटनेवर सुद्धा त्यांनी सल्लागार म्हणून काम केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)