सामाजिक वनीकरण विभाग सिंधुदुर्ग - परिक्षेत्र तळेरे यांच्यावतीने चाफेड - गावठण रस्त्याच्या दुतर्फा मार्गावर विविध वृक्षांची लागवड..!
२ कि.मी. मार्गावर सुमारे १००० वृक्षांची लागवड करण्याचा सामाजिक वनीकरण विभागाचा मानस..!
शिरगाव |संतोष साळसकर :
सामाजिक वनीकरण विभाग सिंधुदुर्ग परिक्षेत्र तळेरे यांच्यावतीने विभागीय वनअधिकारी सुभाष पुराणिक यांच्या मार्गदर्शनाखाली देवगड तालुक्यातील चाफेड- गावठण या रस्त्याच्या दुतर्फा मार्गावर विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. याचा शुभारंभ चाफेड सरपंच सौ. संचीता भोगले आणि ग्रामसेविका सौ. मनीषा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
चाफेड – गावठण या सुमारे २ कि. मी. मार्गावर काजू,आंबे, आवळा,चिंच, बेल,फणस,जांभळं,शिवण, हेळा अशा विविध जातीच्या सुमारे १००० झाडांच्या रोपांची लागवड करण्यात येणार आहे. उन्हाळ्यात या मार्गावर खूप उन्ह असते. पादचारी यांना या रस्त्याने चालताना खूप उन्हाचा त्रास सहन करावा लागतो. पूर्वी या मार्गावर आकेशिया या वृक्षांची लागवड करण्यात आली होती. मात्र त्या झाडांचा सर्वांनाच त्रास जाणवत होता. आता ती झाडे नामशेष झालीत. त्याच जागेवर आता विविध प्रकारची फळधारणा होणारी आणि लोकांनाही या झाडांचा फायदा होईल या चांगल्या उद्देशाने सामाजिक वनीकरण विभागाने ही विविध फळे देणारी झाडे लावण्यास सुरवात केली.
सुरवातीला ३ वर्षे ही झाडे मोठी होईपर्यंत सामाजिक वनीकरण विभाग जोपासना करणार आहे. त्यानंतर त्याची जबाबदारी संबंधित ग्रामपंचायतीकडे वर्ग करण्यात येणार अशी माहिती वनविभागाकडून सांगण्यात आली.
यावेळी चाफेड गावच्या सरपंच सौ. संचीता भोगले, वनक्षेत्रपाल सार्वजनिक वनीकरण तळेरे चे विनोद बेलवाडकर, वनक्षेत्रपाल- देवगडच्या अनिता गोडेकर, वनपाल – कणकवली चे किशोर जंगले, फोंड्याचे वनपाल शिवाजी इंदुलकर, वनरक्षक शिरगाव च्या आरती खेडेकर, माजी सरपंच संतोष साळसकर,संतोष भोगले, प्रदीप घाडी, वनमजूर चेतन तोरसकर,पृथ्वी माळवदे,संतोष मरये आदींसह इतर मजूर,ग्रामस्थ उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)