" आताची तरुण पिढी सोशल मिडीयाने बरबाद केली आहे "- प्रा. रूपेश पाटील .
चौके | अमोल गोसावी :
” दहावी आणि बारावीच्या निकालात राज्यात प्रथम क्रमांकावर असलेली गुणवत्ता स्पर्धा परिक्षेत मागे का पडते यावर गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. आताची तरुण पिढी सोशल मिडियाच्या चुकीच्या वापराने बरबाद होत आहे. म्हणून शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी किंवा समस्या सोडविण्यासाठीच सोशल मीडियाचा वापर करा. मोबाईलचा अतिवापर टाळा. शालेय जीवनापासूनच तुमच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो, त्या आत्मविश्वासाने तुमचे करिअर घडवा आणि यश संपादन करा. मनुष्य बालवयात जसा विचार करतो तसा तो आपल्या पुढील आयुष्यात बनतो. झपाट्याने विकसित होणाऱ्या शैक्षणिक पध्दतीचा स्वीकार करून तुमचे करिअर निश्चित करा आणि त्यादृष्टीने सातत्याने प्रयत्न करून आयुष्यात यश मिळवा. ” असे प्रतिपादन आजगाव अध्यापक विद्यालयाचे प्राध्यापक श्री. रुपेश पाटील यांनी कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील करिअर यावर काळसे हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन करताना केले.
काळसे धामापूर शिक्षण प्रसारक मंडळ काळसे च्या वतीने विद्यार्थ्यांसाठी करिअर आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्राध्यापक रुपेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी संस्था अध्यक्ष हेमंत परब , उपाध्यक्ष योगेश राऊळ ,सचिव केशव सावंत, सहसचिव गजानन प्रभु, खजिनदार दाजी परब संचालक व सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी विनोद गोसावी, संचालक व सेवानिवृत्त तहसीलदार शरद गोसावी , संचालक राजन प्रभु , माजी संचालक सुवर्णा काळसेकर , परफेक्ट ॲकॅडमी कुडाळचे प्रा. राजाराम परब, मुख्याध्यापक तुकाराम पेडणेकर , आदी मान्यवर तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)