डेंग्यूच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्कता बाळगावी : सरपंच अक्रम खान.
बांदा आरोग्य केंद्रात कार्यशाळा संपन्न…!
बांदा | राकेश परब :
बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत वाढत्या डेंग्यू रुग्णांच्या पार्श्वभूमीवर सरपंच अक्रम खान यांच्या पुढाकाराने परिसरातील खासगी डॉक्टर, ग्रामपंचायत सदस्य व बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी यांच्या उपस्थितीत डेंग्यूबाबत कार्यशाळा संपन्न झाली. बांदा पीएचसी अंतर्गत सर्व गावांमध्ये सर्व्हेक्षण करण्यात येत असून रुग्णांवर त्वरीत उपचार करण्यात येत असल्याचे डॉ. जगदीश पाटील यांनी सांगितले. डेंग्यूचा प्रसार रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्याचे आदेश यावेळी सरपंच अक्रम खान यांनी आरोग्य विभागाला दिले.
बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत आतापर्यंत ६ डेंग्यू पॉझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आरोग्य विभागासह बांदा ग्रामपंचायत प्रशासनही अलर्ट झाले आहे. बांदा पीएचसीमध्ये याबाबत तातडीची कार्यशाळा संपन्न झाली. यावेळी सरपंच अक्रम खान, ग्रा. पं. सदस्य जावेद खतीब, साई काणेकर, मकरंद तोरसकर, बाळू सावंत, शाम मांजरेकर, राजेश विरनोडकर, सौ. अंकिता देसाई, वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील, डॉ. सावळ, डॉ. संजय बर्वे, डॉ. केरकर, ग्रा. पं. कर्मचारी संजय सावंत व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी डॉ. जगदीश पाटील यांनी डेंग्यूच्या सद्यस्थितीची माहिती दिली. ताप, सांधेदुखी रुग्ण असल्यास उपचारासाठी आरोग्य केंद्रात येणे, साठलेल्या पाण्यात गप्पी मासे सोडणे, घराच्या परिसरात टायर, प्लास्टिकच्या भांड्यात पाणी साठू न देणे, डबकी बुजविणे अथवा वाहती करणे, मच्छरदाणीचा वापर करणे, आठवड्यातून एकदा घरातील सर्व भांडी कोरडी ठेवणे अशा उपाययोजना सुचविण्यात आल्या.
बांदा शहरासह डिंगणे गावात डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यास आपण कटिबद्ध असल्याचे अक्रम खान यांनी सांगितले. पावसाळ्यात घराशेजारील परिसर स्वच्छ ठेवावा तसेच ताप आल्यास त्वरित उपचारासाठी आरोग्य केंद्रात येण्याचे आवाहन सरपंच अक्रम खान व डॉ. जगदीश पाटील यांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)