रगडिता वाळूही आक्रंदे ; वाळू शिल्पकार समीर चांदरकर यांची जाहीर खंत.
कला, स्थानिक कलाकार व कलाकृतीच्या होणार्या विटंबनेवर केले जाहीर भाष्य.
सेलिब्रिटी म्हणजेच कलाकार…आणि स्थानिक कलाकार भासतोय की ठरतोय लाचार…?
मालवण | सुयोग पंडित : जिल्ह्यातील किनार्यांवरील महोत्सवांदरम्यान कला,कलाकार आणि कलाकृतीचा सर्व बाजूंनी अनादर होत असल्याची खंत सुप्रसिद्ध वाळू शिल्पकार व निर्मिती कलावंत समीर चांदरकर यांनी सामाजिक मंचावरुन जाहीर व्यक्त केली आहे.
निसर्गाला पडलेले सुंदर स्वप्न म्हणजे सिंधुदुर्ग असून त्याच्या प्रत्येक चौकटीमध्ये तुम्हाला सौंदर्याची अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही हे सांगताना समीर चांदरकर यांनी हेच सौंदर्य अनुभवायला दरवर्षी लाखो पर्यटक आपल्या जिल्ह्यामध्ये येतात हे अधोरेखीत केले आहे. याच मातीतील तळागाळात कलाकारांचीही खाण आहे अशी कलावंत वास्तवता त्यांनी मांडली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळीकडेच अनेक निर्बंध होते पण जसजशी कोरोना ची लाट ओसरली तसेच सर्वच व्यवहार पूर्वपदावर आले,सार्वजनिक कार्यक्रम जोर धरू लागले ,गावोगावी क्रिकेट स्पर्धांना उत आला,महोत्सवाचे आयोजन होऊ लागले,,त्या निमित्ताने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. जिल्ह्यात सर्वसाधारण स्पर्धांचे स्वरूप ठरलेले असते त्यात रेकॉर्ड डान्स ,पैठणी स्पर्धा ,पाककला स्पर्धा,कराओके गायन अशा लोकांचे मनोरंजन करणाऱ्या स्पर्धा असतात.क्वचित एखादे मंडळ किंवा कार्यक्रम नियोजन समिती रांगोळी ,चित्रकला,वाळूशिल्प अशा स्पर्धा आयोजित करते.
या स्पर्धांच्या बक्षिसांचा रकमाही अत्यल्प असतात. कधीकधी तर रांगोळीचा खर्च, प्रवास खर्चसुद्धा त्या रकमेतून निघत नाही अशी आर्थिक विवंचना तथा व्यथा समीर चांदरकर यांनी मांडली आहे.
मुळात अशा स्पर्धा भरवल्या जातात कारण कलाकारांना वैयक्तिक मानधन देण्यापेक्षा स्पर्धेमध्ये काही जेमतेम बक्षिसाच्या रुपाने रक्कम देऊन जास्तीत जास्त स्पर्धकांचा सहभाग वाढवता येतो .
सर्व कलाकारांना मानधन देऊन त्यांच्याकडून प्रदर्शनीय कलाकृती साकार करून घेणे अपेक्षित असते. मुंबई-पुण्यासारख्या शहरांमध्ये विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने प्रदर्शनीय कलाकृती साकार केले जातात आणि कलाकारांना योग्य ते मानधन देऊन त्यांचा सन्मान केला जातो आणि स्पर्धा हा विषय ईर्षेचा रहातच नाही
नुकतेच सुंदर अशा समुद्रकिनारी अशाच एका महोत्सवाच्या दरम्याने वाळू शिल्पस्पर्धा व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. बराच काळ एखाद्या कलाकृती निर्मितीपासून दूर असलेले कलावंत या प्रदर्शनामध्ये सहभागी झाले .अशा स्पर्धा व प्रदर्शनांमधूनच भावी कलाकार घडत असतात. कसलेल्या कलाकारांसोबत उदयोन्मुख कलाकार देखील कलाकृतीतील बारकावे शिकत असतात. त्यामुळे अशा स्पर्धा व प्रदर्शनांमध्ये सहभागी होण्यासाठी कलाकार मागचा-पुढचा कुठलाही विचार करत नाही.परंतु आयोजकांनसाठी अशा स्पर्धा म्हणजे केवळ पब्लिसिटी स्टंट असतो असा आरोप समीर चांदरकर यांनी केला आहे.
या स्पर्धांसाठी नेमके कोणते नियोजन करावे किंवा कोणत्या सोयी सुविधा पुरवाव्यात याबाबत कसलाही विचार विनिमय संबंधित कलाकारांशी होत नाही . वाळुशिल्प कलावंताने जीव ओतून केलेल्या कलाकृतीची अशी विटंबना होत असताना पाहणे या यामुळे कलावंतांना प्रचंड यातना होऊन त्यांचे मन आक्रंदते.
लाखो रुपये खर्च करून उत्सवांचे, कार्यक्रमांचे आयोजन होते .मोठमोठ्या सेलिब्रिटींना बोलवलं जाते.त्यांचा भव्य सन्मान होतो .पण दुसरीकडे एका कलाकाराने साकारलेली रांगोळी असेल ,वाळू शिल्प असेल त्यासंदर्भात कोणत्याही प्रकारची व्यवस्था केलेली नसते. एखादा कलाकार जर आपल्या कुटुंबियांना, मित्र परिवाराला ती रांगोळी ,वाळू शिल्प जेव्हा दाखवायला जातो तेव्हा त्या वाळू शिल्पाच्या ढिगावर मुले अक्षरशः खेळताना दिसतात व मोकाट गुरे कलाकृती विस्कटून तिथे कलेचा सत्यानाश करताना दिसतात. कलाकार हा शेवटी कलाकार असतो मग सेलिब्रिटींना वेगळी वागणूक आणि स्थानिक कलाकारांकडे मात्र दुर्लक्ष का होतेय असा प्रश्न समीर चांदरकर यांनी महोत्सव आयोजन समिती व सर्वांनाच विचारलेला आहे.
काही वर्षांपूर्वी ‘सिंधुदुर्ग महोत्सव’ च्या निमित्ताने सुप्रसिद्ध वाळू शिल्पकार सुदर्शन पटनाईक सर आपल्या मालवण येथे आले होते. त्यांच्याकडून वाळू शिल्पाची धडे इथल्या स्थानिक कलाकारांना मिळतील अशी अपेक्षा होती परंतु स्थानिक कलाकारांसाठी उघड्या जागेवर वाळू शिल्पाची व्यवस्था केली होती तर पटनाईक सरांच्या वाळू शिल्पासाठी मात्र चारही बाजूंनी बंदिस्त अशी जागा उपलब्ध करून देण्यात आली होती. त्या बंदिस्त जागेतच त्यांनी वाळू शिल्प साकारले
शिल्प पूर्ण होईपर्यंत कुणालाही त्या जागी प्रवेश दिला गेला नाही. त्यामुळे स्थानिक कलाकारांचा हिरमोड झाला.वाळू शिल्प, रांगोळी या अल्पायुषी कला आहेत. त्यांची योग्य ती काळजी घेतली नाही तर काही क्षणात अशा कलाकृती नष्ट होतात. त्या कलाकृती खाली कलाकृती बनवणाऱ्या कलाकाराचा साधा उल्लेखही नसतो.
अशा प्रकारच्या स्पर्धांचे, प्रदर्शनाचे आयोजन करताना आयोजकांनी निश्चितच या गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे, एकेकाळी आदरणीय गुणवंत मांजरेकर सर यांच्यासारखे राष्ट्रीय पुरस्कार विजेते रांगोळीकार आपल्या जिल्ह्याने देशाला दिले नंतरच्या काळामध्ये मात्र स्थानिक कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्यात इथल्या आयोजन समित्यांनी पुरेसा रस दाखवला नाही. परिणामी अशा स्पर्धांकडे स्पर्धकांनी पाठ फिरवली, आजच्या आभासी जगात खरे कलावंत घडवायचे असतील तर कलाकारांना प्रोत्साहन देणे व त्यासाठी आर्थिक तरतूद करणे क्रमप्राप्त आहे, पर्यटनदृष्ट्या विकसित होऊ पाहणाऱ्या आपल्या जिल्ह्यामध्ये जर कलाकारांना योग्य व्यासपीठ मिळालं तसेच कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये त्यांच्या मतांचा आदर केला किंवा मार्गदर्शन घेतले तर अतिशय दर्जेदार कलाकृतींचा आनंद रसिकांना घेता येईल तसेच आपल्या जिल्ह्यातील कलाकारांना चांगले व्यासपीठ मिळेल त्याच बरोबर त्यांना त्यातून आर्थिक लाभही मिळेल.पर्यायाने आपल्या जिल्ह्याचा नावलौकिक आणखीन वाढविण्यासाठी प्रत्येक कलावंत मनापासून व कर्तव्य जाणिवेने झटेल असे वस्तुनिष्ठ समिकरण समीर चांदरकर यांनी स्पष्ट केले आहे.
समीर चांदरकर यांनी मांडलेली व्यथा ही ‘सेलिब्रिटी म्हणजेच कलाकार व स्थानिक कलाकार का ठरतोय किंवा भासतोय लाचार’ अशा स्थानिक कलावंताला सतत भेडसावणार्या प्रश्नाचा जाब विचारते आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)